https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

कर्मगोष्टींचा मंत्रचळ!

कर्मगोष्टींचा मंत्रचळ एक चक्रव्यूह!

आपले विशाल विश्व हे अनेकविध मूलद्रव्यांनी व त्यांच्या मुळाशी असलेल्या अनेकविध मूलतत्त्वांनी बनलेले आहे. विविधतेने नटलेली ही द्रव्ये व त्यांच्या मुळाशी असलेली ही तत्वे अनेक आहेत. अर्थात विश्वात मूलद्रव्ये व मूलतत्वांची विविधता आहे तशी त्यांची अनेकता आहे. या मूलद्रव्यांना व मूलतत्वांना विविध प्रकारच्या अनेक जैविक, अजैविक कर्मगोष्टी चिकटलेल्या आहेत. हिंदू धर्मशास्त्रातील अनेकविध देवदेवता विश्वातील अनेकविध मूलद्रव्यांची, मूलतत्त्वांची व कर्मगोष्टींची प्रतीके होत.

माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाने त्याच्यावर सोपवलेल्या अनेकविध कर्मगोष्टींचा भार ज्या भाराच्या मुळाशी विश्वातील अनेकविध मूलद्रव्ये व मूलतत्वे आहेत. माणूस हा या अनेकविध मूलद्रव्यांतून व मूलतत्त्वांतूनच उत्क्रांत झालेला बुद्धिमान प्राणी आहे. सजीवांची बुद्धी हे सुद्धा विश्वाचे एक तत्व आहे ज्या मूलतत्वाचे प्रतीक म्हणजे हिंदू धर्मशास्त्रातील श्रीगणेश हा बुद्धीदेव ज्याचे मेंदूमन हे निवासस्थान आहे. पण एक प्रतीक म्हणून मानवी मन बुद्धीदेव श्रीगणेशाची बाह्य मंदिरात स्थापना करून या देवाचे स्मरण, मनन व चिंतन (ध्यान) करू शकते.

मानवी जीवनातील एखादी कर्मगोष्ट ही छोटी असो की मोठी पण कोणत्याही एका कर्मगोष्टीकडे मन अधिक लक्ष देऊ लागले व तिच्यात स्वतःला जास्त काळ गुंतवून घेऊ लागले की मानवी मेंदूमनाला त्या गोष्टीचा मंत्रचळ लागतो. मंत्रचळ म्हणजे एखाद्या कर्मगोष्टीचे वेड. या वेडाने मानवी मन बेचैन होऊन अस्थिर व अशांत होते. त्या गोष्टीने मनाची अवस्था पछाडलेली होते. ते त्याच कर्मगोष्टी भोवती भिरभिरत राहते.

हा एक विचित्र सापळा, चक्रव्यूह आहे. या सापळ्यातून, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक काम झाले की लगेच दुसऱ्या कामाकडे लक्ष वळवले पाहिजे. कामातील बदल हीच मेंदूमनाची विश्रांती असे विज्ञान सांगते. निसर्गाचे भौतिक विज्ञान व परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म या दोन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. भौतिक निसर्ग दिसतो पण त्यात असलेली अलौकिक चैतन्य शक्ती दिसत नाही. निसर्गाच्या माध्यमातूनच त्या चैतन्य शक्तीचा म्हणजे परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असतो. परमेश्वराचे अस्तित्व मान्य करीत नाही तो नास्तिक व मान्य करतो तो आस्तिक, पण कोणी नास्तिक असो की आस्तिक, चैतन्य शक्ती परमेश्वर ही अशी गोष्ट आहे की ती सोड म्हटले तरी सोडता येत नाही व धर म्हटले तरी धरता येत नाही. सर्व मंगलमय होवो!

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२३

बदल घडविण्याचा फाजील ताण!

बदल घडविण्याचा फाजील ताण!

निसर्गाचे विज्ञान हा अखंडितपणे वाहणारा जोरदार अनिवार्य प्रवाह आहे. पण त्यात मानवासाठी एक स्वातंत्र्य दडलेले आहे व ते म्हणजे माणूस त्याच्या तांत्रिकी व विवेकी बुद्धीने या विज्ञान प्रवाहाला सोयीचे वळण व आकार देऊ शकतो. पण तांत्रिकी व विवेकी वळण व आकार देण्याच्या या मानवी कार्यक्रमावर (science turning & shaping programme) निसर्गानेच काही मूलभूत मर्यादा घातल्या आहेत. त्या वेळीच ओळखता आल्या पाहिजेत. या मर्यादेपलिकडे निसर्ग विज्ञानात तांत्रिकी व विवेकी बदल करण्याचा अट्टाहास चुकीचा. असा अट्टाहास हा निसर्गाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक होय. या अट्टाहासातून माणूस या बदलाविषयी अती विचार (over thinking) व अती कृती (over acting) करतो व त्याच्या जीवनातील नैसर्गिक आनंद व शांती घालवून बसतो. परंतु मूलभूत समज  येण्यासाठी केलेला मूलभूत विचार हा अती विचार नसतो व मूलभूत जगण्यासाठी केलेली मूलभूत कृती ही अती कृती नसते (thinking for basic understanding is not over thinking & acting for basic living is not over acting). विज्ञानाला तांत्रिकी व विवेकी वळण व आकार देण्याच्या अर्थात विज्ञानात सोयीस्कर बदल घडविण्याच्या कार्यक्रमाचा अती विचार करणे व त्यासंबंधी अती कृती करणे हे अनैसर्गिक व म्हणूनच चुकीचे, बेकायदेशीर होय. या विचित्र सवयीपासून वेळीच सावध होऊन बाजूला होणे व निसर्गाच्या मर्यादेपलिकडे निसर्ग विज्ञानाच्या प्रवाहाविरूद्ध नव्हे तर प्रवाहाबरोबर वाहत जाणे म्हणजे प्रवाहपतित होणे हे नैसर्गिक व कायदेशीर होय. याचा अर्थ एवढाच की निसर्गात व त्याच्या विज्ञानात तांत्रिकी व विवेकी बदल घडविण्याच्या अट्टाहासापोटी अती विचार व अती कृतीचा फाजील ताण माणसाने मनावर व शरीरावर घेऊ नये!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२३

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

माझ्या वंशाची पणती!

माझी वंशाची पणती!

मला मुलगी हेच प्रथम अपत्य असल्याने मुलगा का नाही म्हणून दुसऱ्या अपत्याचा आग्रह इतर अनेक जणांनी केला. इतकेच काय माझी आई मला म्हणायची की "अरे बाळू, वंशाला एक तरी दिवा असावा"! तेंव्हा माझे तिला एकच उत्तर असायचे की "माझी ही एकच वंशाची पणती असणार पण ती साऱ्या घराबाराला उजळून काढणार"! पुरूषप्रधान संस्कृतीच्या अशा शब्दांपासूनच माझ्या मुलीवर अप्रत्यक्षपणे नकारात्मक प्रवाहांचा (इंग्रजीत निगेटिव्ह वायब्रेशन्सचा) भडिमार सुरू झाला. क्षुल्लक कारणांवरून व काही गैरसमजांतून आम्हा पती पत्नीत वाद, भांडणे होत होती. त्या नकारात्मक वातावरणाचा माझ्या मुलीवर वाईट परिणाम होत होता. पण तरीही जिद्दीने अभ्यास करून तिच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने एम.बी.ए. चा फुल टाईम कोर्स एका नामांकित व्यवस्थापन संस्थेतून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण करून स्वकर्तुत्वावर आज ती एका फार मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत सिनियर मार्केटिंग मॕनेजर पदावर आहे याचा मला खूप अभिमान आहे. हे सर्व यश मिळवत असताना ती स्वतःसाठी योग्य तो जोडीदार शोधत होती. बाप म्हणून मी मात्र मुलीच्या काळजीने लग्नासाठी तिच्या मागे लागून तिच्यावर रागाने ओरडत होतो. परंतु तरीही तिने मला कधीही उलट उत्तर दिले नाही. तिने आयुष्यात एवढे मोठे यश कमी वयातच प्राप्त केल्यावर शेवटी एका विवाह मंडळाच्या माध्यमातून तिला योग्य असलेला जोडीदार निवडून विवाह केला. माझा जावई एम.बी.ए. (लंडन) असून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डायरेक्टर आहे व शिवाय स्वतःच्या फॕक्टरीचा मालक आहे. इतकेच नव्हे तर माझी मुलगी मला पापा व जावई मला डॕडी म्हणून नुसते फोनच करीत नाहीत तर माझ्या डोंबिवलीच्या फ्लॅटवर दोघेही येतात व आम्हा पतीपत्नीलाही त्यांच्या अंधेरीच्या फ्लॅटवर घेऊन जातात. माझी मुलगी तर मला सारखी म्हणते की "पापा, आता नका कुठे कामासाठी जाऊ, घरी आराम करा, दोघे पर्यटन करा, मी तुम्हाला पैसे देईन, मी तुम्हाला सांभाळेन"! हे तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. पण तरीही मला मनात वाईट वाटतेच की, मी माझ्या सोन्यासारख्या मुलीला हवे तसे अनुकूल वातावरण दिले नाही. मी तुम्हाला आता तिच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. ती लहान असताना एकदा तिने एका कार्यक्रमात कठीण प्रश्नांची उत्तरे देऊन एक नंबरचे बक्षीस म्हणून टी शर्ट मिळवला तर मी तो तिच्या हातातून काढून घेऊन दुसऱ्या एका मुलास दिला कारण काय तर तो तिकडे हिरमुसला होऊन बसला होता म्हणून. माझी मुलगी मला नंतर म्हणाली की "पापा, प्रश्नांची उत्तरे मी दिली होती ना, मग मी मिळवलेल्या त्या बक्षीसावर हक्क माझा होता की त्या मुलाचा"? तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू येतात. नशीब काय असे हिसकावून थोडेच मिळते? नशीब हे स्वकर्तुत्वाने मिळवावे लागते. आजच्या काळात सुद्धा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा मनावर असलेले लोक मुलगा नसेल तर संसारात अर्थ नाही असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा मला त्यांची कीव येते. एकुलत्या एक मुलीलाच मी माझा मुलगा समजलो व माझी हीच एकुलती एक मुलगी एक दिवस माझे नाव मोठे करणार व माझ्या म्हातारपणीचा आधार होणार हे मी पाहिलेले स्वप्न माझ्या या एकुलत्या एक मुलीने पूर्ण केले आहे. एवढे मोठे सुख व समाधान मला निसर्गाने म्हणा की मनाला जाणीव करून देणाऱ्या निसर्गातील अलौकिक शक्तीने म्हणा  दिले त्या शक्तीचे मी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत!

-बाळूमामा, २७.१२.२०२१

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाती!

बोला की बाळूमामा!

काही नाती जन्माने चिकटली, काही लग्नाने बनली, काही अशीच योगायोगाने जमली, काही जुळली, काही परिस्थिती, प्रसंगाने डळमळीत होऊन तुटली. हवामान बदलते तशी माणसे बदलतात व मग नातीही बदलतात.

व्यावहारिक नाती ही व्यवहारापुरती मर्यादित राहतात. व्यवहार संपला की नाते संपले. जर व्यवहार दीर्घकाळ टिकले तर व्यावहारिक नाती सुद्धा दीर्घकाळ टिकतात. व्यवहार नाही पण भावनिक जवळीक आहे अशी नाती भावनिक आधारावर टिकतात. भावनिक जवळीकेला वैचारिक जवळीकेची जोड मिळाली म्हणजे विचार जुळले की नाती अधिक घट्ट होतात.

व्यवहार कशाला म्हणतात तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या देवाणघेवाणीला व्यवहार म्हणतात. व्यवहारात स्वार्थ असतो. स्वार्थाचे समाधान दोन्ही बाजूने झाले पाहिजे. पण स्वार्थाला महास्वार्थ चिकटला की मग तो व्यवहार राहत नाही. मीच एकटा सगळं खाईन तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल असा विचार जेंव्हा बुद्धी करते तेंव्हा ती महास्वार्थी झालेली असते. 

नाती जर नुसती व्यावहारिक असतील तर ती व्यवहारापुरती कोरडी असतात. अशा नात्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीची खरी कसोटी तेंव्हाच लागते जेंव्हा नात्यात भावनाही असते व स्वार्थी व्यवहारही असतो. पण काही नाती ही भावनिक जवळीक व वैचारिक सुसंवादावर आधारित असतात. अशा नात्यांत स्वार्थ नसतो व स्वार्थ नसल्याने व्यवहारही नसतो.

माझीही अशी काही भावनिक नाती आहेत की जिथे व्यवहार नसल्याने व विचार सरळस्पष्ट असल्याने वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भामाताई ही तर माझी मावस मावस बहीण होती. पण तिच्याबरोबरचे माझे नाते हे मनमोकळे होते. कारण त्या नात्यात फक्त भावनिक जवळीक होती. व्यवहार बिलकुल नव्हता. हल्लीच ती बहीण हे जग सोडून गेली. त्यामुळे ते निर्मळ माया प्रेमाचे भावनिक नाते नैसर्गिक रीत्या संपले. पण तिचा मुलगा शिवा हा तिच्या स्वभावासारखाच आहे व त्यामुळे त्याच्याशी बोलताना भामाताईचा तो फिल येतो. परवा त्याला असाच फोन केला तर तिकडून त्याचा नेहमीचाच गोड आवाज आला "बोला की बाळूमामा"! आवाजात तोच गोडवा व तीच निर्मळ भावना जी भामाताईत होती. कसले व्यावहारिक देणे नाही की घेणे नाही. नुसती भावनिक जवळीक. अशी नाती दुर्मिळ असतात. 

-बाळू, २५.१२.२०२१

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

राम कृष्ण हरी!

देव प्रार्थना!

आपल्या जवळच्या माणसांशी जशी आपली नाळ जुळते तशी आपल्या जवळच्या धार्मिक  संस्कृतीशी व आपल्या जवळच्या देवदेवतांशी आपली नाळ जुळते. म्हणून आपल्या धर्मातील लोकांमध्ये विवाह केल्यास जवळच्या संस्कृती साधर्म्यामुळे संसारात अडचणी कमी होतात. बाकी हल्ली सुशिक्षित, अती सुशिक्षित लोक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करताना दिसून येतात. शिक्षण, विचार त्यांना संसारात एकत्र ठेवत असतील तर तेही योग्यच म्हणावे लागेल.

पण जवळीक ही महत्वाची. आपण हिंदू धर्मीय लोक मंदिरांसमोरून जातो तेंव्हा आपले हात आपोआप जोडले जातात. पण आपण जर इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांपुढून गेलो तर तसे होत नाही याचे कारण म्हणजे आपल्या धर्माशी व देवदेवतांशी लहानपणापासून जोडली गेलेली आपली नाळ. अशी जवळीक आपल्या कुळ देवतेशी व आपल्या ग्रामदेवतेशी असते. विशेष बाब ही की माझे वडील करमाळा तालुक्यात असलेल्या साडे गावचे व माझी आई माढा तालुक्यात असलेल्या ढवळस गावची. दोन्ही गावे सोलापूर जिल्ह्यातीलच. साडेगावचे ग्राम दैवत कोणते तर कोडलिंग (खरं तर कोटलिंग म्हणजे महादेव/शंकर) व ढवळसची ग्रामदेवता कोणती तर अंबाबाई ( म्हणजे शंकर पत्नी पार्वती). म्हणजे काय तर वडिलांचे ग्रामदैवत शंकर व आईची ग्रामदेवता पार्वती. या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या बघा काका-आईच्या विवाहाने! मी ढवळस गावाला मावशी बरोबर (माझ्या आईची सख्खी बहीण ) जाऊन उंच टेकडीवर असलेल्या अंबाबाईचे एकदा दर्शन घेतलेय. पण मी अजूनही वडिलांच्या साडे गावातील कोडलिंगाचे दर्शन घेतलेले नाही. ही गोष्ट ग्रामदैवतांची. पण माझे कुळदैवत कोणते हे ६५ वय झाले तरी अजूनही मला माहित नाही हे विशेष! याचे कारण काय तर माझे वडील (काका) हेच मुळात तेवढे आध्यात्मिक नव्हते. त्यांनी कधीही घरात ग्रामदैवत, कुळदैवत यांचा आग्रह धरला नाही की साडे गावाला आम्हाला घेऊन गेले नाहीत. माझी आई मात्र घरातील देव्हाऱ्यात पितळेचे देव ठेवून तिला जमेल तशी पूजा करायची. पण ती निरक्षर असल्याने तिला त्या देव्हाऱ्यातील ग्रामदैवत कोण व कुळदैवत कोण हे आम्हाला सांगता येत नसे. त्यामुळे माझ्या मनावर आईच्या देवधर्मापेक्षा काकांच्या बिनधास्त राहण्याचाच जास्त पगडा पडला. या इथे जवळीक या शब्दाला अर्थ आहे. आपल्या मनावर पगडा ज्याच्याशी आपली जवळीक निर्माण होते त्याचाच पडतो.

गजू व बळी, तुम्हाला आठवत असेल की तुमची आई  ही परडी भरायची. तुमच्या आईची ती परडी मी लहानपणी बारकाईने न्याहाळत बसायचो. पण मला ते नीट कळत नसायचे. ती परडी अंबाबाई देवीची असते बहुतेक, नक्की माहित नाही व ठामपणे सांगताही येणार नाही. कारण परडीशी जवळीक निर्माण झाली नाही व त्यामुळे तिचा पगडा माझ्या मनावर पडला नाही. 

पुण्याच्या भाऊजीबरोबर मी दोन, तीन वेळा सोनारीला गेलोय. तिथली गाव जत्रा पाहिलीय व सोनारीचे ग्रामदैवत भैरवनाथ (शंकराचा अवतार) याचेही दर्शन घेतलेय. मागे बहिणीच्या  कुटुंबाबरोबर कोल्हापूरच्या जोतीबाला जाऊन (तोही शंकराचाच अवतार) त्याचेही दर्शन घेतलेय. मात्र अजून जेजुरीच्या खंडोबाचे (तोही शंकराचाच अवतार) दर्शन घेतलेले नाही.

हिंदू धर्मात शिव पंथी व वैष्णव पंथी असे दोन पंथ आहेत. शिवपंथीयांची जवळीक शंकराशी जास्त तर वैष्णवपंथीयांची जवळीक विष्णूशी जास्त. वर उल्लेखित भैरवनाथ, जोतिबा व खंडोबा हे शंकराचे अवतार आहेत तर राम, कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. पंढरपूरचा पांडुरंग (विठ्ठल) हा कृष्णच म्हणजे विष्णूचा अवतार. मोहोळची ताई व दादा हे पंढरपूरकरच व त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) जास्त संस्कार. त्यामुळे त्यांचा मुलगा नेहमी "राम कृष्ण हरी" असे म्हणून देव प्रार्थना करतो. राम काय किंवा कृष्ण काय दोघेही विष्णूचेच अवतार. मग आपल्या नातेवाईकांत भाऊजी  भैरवनाथी म्हणजे शिवपंथी व ताईचा मुलगा पांडुरंगी म्हणजे वैष्णवपंथी झाले काय?

माझी दोन बहिणी व माझी भावजय यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे मोठे फोटो मला पहायला मिळतात. श्री स्वामी समर्थांशी त्यांची ही जी जवळीक निर्माण झालीय ती बहुतेक एखाद्या अनुभूतीमुळे झाली असावी. माझा मुंबईत एका श्री स्वामी समर्थ मठाशी योगायोगाने संबंध आला. पण मी त्यांचे आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करीत नाही. कारण एकंदरीतच सगळ्या देवाधर्माविषयीचा माझा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. पण मी सगळ्या देवांना नमस्कार करतो. कारण विश्वात, निसर्गात कोणती तरी अद्भुत, अनाकलनीय शक्ती आहे व ती शक्ती म्हणजेच परमेश्वर, परमात्मा असे मी मानतो. तो एकच आहे. फक्त त्याचे अवतार (इतर धर्मात देवाच्या अवतारांना देवदूत म्हणतात) निरनिराळे आहेत असे मी मानतो. त्यामुळे श्री भैरवनाथ काय, श्री स्वामी समर्थ काय किंवा राम कृष्ण हरी काय या सगळ्याच देव प्रार्थना एकाच परमेश्वराला, परमात्म्याला जाऊन मिळतात असे मी मानतो.

माझे बालपण पंढरपूरला श्रीविठ्ठल मंदिराच्या सान्निध्यात गेले असल्याने त्या देवाशी थोडीशी जास्तच जवळीक निर्माण झाली आहे व म्हणून "राम कृष्ण हरी" असे म्हणून या लेखाचा शेवट करतो.

राम कृष्ण हरी!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.१२.२०२१

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

वृद्धत्व विकास!

उतार वयातील कमकुवतपणा व विकास!

लहानपणातली व तारूण्यातील उत्साह, ताकद व चपळता उतार वयात कमी झालेली असते. अर्थशास्त्रात उतरत्या सीमांत उपयोगितेचा एक नियम आहे (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलिटी). त्याप्रमाणे मानवी शरीर व मनाची निसर्गाला असलेली उपयुक्तता वाढत्या वयानुसार कमी कमी होत गेल्याने तो निसर्ग मानवी शरीर व मनाला (शरीरातच मन असते, मनात शरीर नव्हे) भंगारात काढण्याची तयारी करीत असावा व त्यामुळेच उतार वयात मानवी शरीर व मन कमकुवत होत जात असावे. या उतार प्रक्रियेला मानवी शरीर व मनाचा घसारा (इंग्रजीत डिप्रिशियशन) असेही अर्थहिशोबी भाषेत म्हणता येईल. म्हातारपणीच्या या उतार प्रक्रियेला उतरत्या सीमांत क्षमतेचा नियम (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग ॲबिलिटी) असेही म्हणता येईल. त्यामुळे होते काय की शरीरावरची घाण साफ करण्यासाठी लागणारी टूथब्रश, दाढीचे ब्लेड, मिशीचे केस कापण्याची कात्री यासारखी शस्त्रे हाताबोटांत नीट धरता  येत नाहीत. हातपाय कंप पावतात, थरथरतात. याचे कारण म्हणजे शरीराचे अवयव कमकुवत झालेले असतात. मेंदू (ज्यात मन असते) हाही शरीराचा अवयव (शरीराचा राजा का असेना) असल्याने तोही मेंदूपेशींसह कमकुवत झालेला असतो. त्यामुळे मन कमकुवत होऊन मनाचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. सगळ्याच सजीवांच्या शरीर व मनात होणारे हे परिवर्तन नैसर्गिक व अनिवार्य असते. त्यामुळे हा बदल स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसते. या नैसर्गिक परिवर्तनाशी सुसंगत वर्तन कसे करता येईल हे पहावे व तसे तंत्र विकसित करावे. यालाही आपण विकासाचा भाग म्हणूया व वृध्दावस्थेत तो भाग शिकूया!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१२.२०२१