सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!
मानवी लैंगिकता व पुनरूत्पादन या नैसर्गिक क्रिया. या क्रियेवर सामाजिक शिस्तीचे बंधन घालण्याच्या उद्देशाने निर्माण झाली ती विवाह संस्था. या विवाह संस्थेतील कौटुंबिक व्यवहार नियंत्रित करणारा कायदा तो विवाह कायदा. विवाह कायदा हा नागरी (सिव्हिल) कायदा होय. मानवी लैंगिकतेच्या अतिरेकावर कठोर बंधन घालणारे फौजदारी कायदे सुद्धा मानव समाजाने निर्माण केले आहेत. उदा. बलात्कार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायदा, मानवी तस्करी (जबरदस्तीने वेश्या व्यवसाय) कायदा इ.
विवाह बंधनात राहून संसार करणे हा जसा एक निर्मळ आनंद आहे तसे ते एक आव्हानही आहे कारण या बंधनात हक्क व कर्तव्ये यांच्यात समतोल साधण्याची कसरत नवरा व बायको दोघांनाही करावी लागते. ही कसरत ज्यांना नकोशी वाटते किंवा नीट जमत नाही ते विवाह बंधन तोडण्याच्या दिशेनेच विचार करून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतात.
एक वकील म्हणून घटस्फोट टाळण्याकडे मी नेहमीच प्रयत्नशील असतो. कारण घटस्फोट ही अत्यंत गंभीर परिस्थितीत निर्णय घेण्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, नवरा बायको पैकी कोणी मनोरूग्ण असणे, पुरूषाची नपुंसकता, नवरा बायको पैकी कोणी व्यभिचारी असणे, सासर कडून हुंड्यासाठी होणार छळ, स्त्रीला चूल व मूल या कामापुरतीच समजून पुरूष प्रधान सासरकडून स्त्रीला मिळणारी कनिष्ठ वागणूक इत्यादी. माझा मुख्य मुद्दा किरकोळ कारणांवरून नवरा बायकोत होणाऱ्या भांडणा पुरता मर्यादित आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाणे, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे तिला तिच्या आईवडिलांनी म्हणणे, तसेच लग्न झाल्यावर मुलीने माहेरचे नाव सोडून देऊन नवऱ्याचे नाव व आडनाव लावणे ही पारंपरिक पद्धत आपल्याकडे अजून सुरूच आहे व ती बहुसंख्येने स्वीकारली गेली आहे.
प्रश्न हा आहे की मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेंव्हा ती आपल्या आईवडिलांना सोडून तर जात असतेच पण मोठ्या विश्वासाने आपले जीवन नवऱ्याला समर्पित करताना एकदम नवख्या घरात प्रवेश करीत असते. त्यामुळे तिला सुरूवातीला असुरक्षित वाटणे हे अगदी साहजिक आहे. त्यात जर सासरची मंडळी तिला स्वतःच्या मुलीसारखी वागणूक न देता परक्यासारखी वागणूक देऊ लागली तर संसार तणावपूर्ण होतो. अशावेळी नवऱ्या मुलाने स्वतःचे आईवडील, भाऊ, बहिणी व आपली बायको यांच्यात संतुलन साधायचे काम केले पाहिजे. ही गोष्ट खूप अवघड असते. खूप मोठे एकत्र कुटुंब असेल तर तिच्या आईवडिलांना सोडून संसार करायला आलेली मुलगी एकटी पडते. अशावेळी जर घाबरून तिने तिच्या आईवडिलांना फोन केले तर तिच्यावर संशय न घेता तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कोणतेही आईवडील आपल्या मुलीचा संसार मोडावा असा प्रयत्न करणार नाहीत. तेंव्हा मुलीच्या संसारात मुलीची आई लुडबूड करून तिच्या संसारात आग लावते असा सर्वसाधारण आरोप करणे चुकीचे आहे. मुलीच्या आईकडे बोट दाखवताना मुलाची आई अगदी गरीब गाय असते असा निष्कर्ष कोणी काढू नये. टाळी एका हाताने वाजत नसते. अशाही केसेस मी पाहिल्या आहेत की मुलगा जर एकुलता एक असेल तर अशा मुलाच्या आईला आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करते की काय अशी भीती वाटल्याने अशी सासू सुनेला जाच करीत राहते. अशावेळी आईलाही सोडता येत नाही व बायकोला घेऊन वेगळेही राहता येत नाही अशी मुलाची पंचाईत होऊन जाते. याला अवघड जागेचे दुखणे म्हणतात. काही वेळा नवरा बायकोच्या किरकोळ भांडणात मुलाचे आईवडील, नातेवाईक नाक खुपसतात तसे मुलीचे आईवडील, नातेवाईकही नाक खुपसतात. नवरा बायकोच्या भांडणात असे इतरांनी नाक खुपसल्याने प्रश्न अवघड होऊन बसतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे खरे आहे. कोणीही फक्त मुलीच्या आईवडिलांना किंवा फक्त मुलाच्या आईवडिलांना दोष देऊन मोकळे होऊ नये. पण शेवटी मुलगी ही तिच्या आईवडिलांना सोडून सासरच्या घरी संसार करायला आलेली असते. त्यामुळे सुरूवातीला तरी तिची बाजू कमकुवत असते हे विसरता कामा नये.
मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ एवढाच की लग्न करताना मुलाने व मुलीने नीट विचार करून लग्न करावे. एकदा लग्न केले की मग हे लग्न कायम टिकलेच पाहिजे हाच तो विचार असावा म्हणजे लग्नापूर्वी शिक्षण, आर्थिक पाया, दोन्ही कडील कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास, विचार करूनच लग्न करावे. दोघे नवरा बायको जर समविचारी, एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना समजून घेणारे असतील तर त्यांच्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू शकत नाही मग ते मुलाचे आईवडील असोत, मुलीचे आईवडील असोत की आणखी कोणी!
माझ्या वकिलीत वैवाहिक केसेस मध्ये मी जास्तीतजास्त संसार जोडण्याचेच प्रयत्न केले आहेत. मी नेहमी दोन्हीकडची माणसे एकत्र बोलावून दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोन्ही बाजूंना त्यांचे प्रश्न काय आहेत व त्यावर कायदा काय म्हणतो हे नीट समजावून सांगतो व मग समेट घडवून आणतो. ज्यांचे संसार मी जुळवले ती मंडळी अजूनही माझे नाव काढतात. एका केसमध्ये तर नवरा उद्योजक व बायको वकील होती. मी नवऱ्याचे वकीलपत्र स्वीकारले होते. तरी मी एका हॉटेलात नवरा व बायको दोघांना चहा प्यायला या, मला दोघांचे म्हणणे एकत्र ऐकायचे आहे असे सांगितले. तेंव्हा दोघांनी माझे म्हणणे ऐकले. त्या एकाच बैठकीत मी दोघांनाही त्यांच्या चुका समजावून सांगितल्या व आयुष्य खूप छोटे आहे, मस्त मजेत एकत्र संसार करा हे समजावून सांगितले. दोघांनाही ते मनापासून पटले. मग त्यांची घटस्फोटाची केस तडजोडीने मागे घेत असल्याचा अर्ज कोर्टात देऊन कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी दोघांत समेट घडवून आणला. आज ते दोघेही नवरा बायको आनंदात संसार करीत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा इंजिनियर झाला आहे व दोघेही नवरा बायको मला अधूनमधून फोन करून सांगतात की "सर, आमच्या मुलाचे लग्न जेंव्हा कधी ठरेल तेंव्हा आमच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद द्यायला तुम्हाला लग्न कुठेही असले तरी यावेच लागेल"! वकिलीतला हा आनंद मला जीवनाचे खूप मोठे समाधान देतो.
माझे पती व पत्नी दोघांनाही एवढेच सांगणे की विवाह, संसार, मुलांचे संगोपन हा अनुभव खरं तर स्वर्गसुख आहे. तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांचे आधार आहात. संसारातील किरकोळ भांडणे स्वतःच मिटवा. तुमच्या संसारात कोणालाही नाक खुपसू देऊ नका मग ते तुमचे आईवडील का असेनात! सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!
-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१