अनैतिकतेच्या पायावर उभा मानवी नैतिकतेचा डोलारा!
(१) सृष्टीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्याशिवाय मानवी संस्कृतीचा अभ्यास अपूर्ण होय. मनुष्य प्राणी हा पर्यावरणीय साखळीचा कळस होय. या कळसाचा पाया काय तर निर्जीव पदार्थ, मग अर्धसजीव वनस्पती, मग वनस्पतीवर जगणारे शाकाहारी सजीव प्राणी, मग शाकाहारी सजीव प्राण्यांवर जगणारे मांसाहारी सजीव प्राणी व सर्वात शेवटी या सगळ्यांचे मिश्रण असलेला मनुष्य प्राणी जो शाकाहारी व मांसाहारी असा दोन्हीही आहे.
(२) ही पर्यावरणीय साखळी कशी उत्क्रांत होत गेली तो सृष्टीचा इतिहासही मोठा रोमांचकारक आहे. पण मनुष्यापर्यंतची उत्क्रांती पूर्ण झाली म्हणजे ती संपली असे नाही. ती चालूच आहे. पण आतापर्यंतच्या उत्क्रांतीतून तयार झालेल्या पर्यावरणीय साखळीतील विविध सजीव व निर्जीव पदार्थ तरी कुठे परिपूर्ण, निश्चित वागत आहेत. नाहीतर पावसाचा लहरीपणा दिसलाच नसता. सृष्टीच्या पर्यावरणीय साखळीतील मानवेतर प्राणी व निर्जीव पदार्थ जर अधूनमधून लहरीपणाने वागतात, तर मग त्यांच्या मूलभूत पायावर उभा असलेला माणूस अधूनमधून लहरीपणाने वागला नाही तर नवलच! सृष्टीतील लहरीपणा व अनिश्चितता मानवी जीवनातही उतरली आहे.
(३) मानवी जीवनाचा व मानवी संस्कृतीचा मूलभूत पाया काय तर पर्यावरणीय साखळी! या साखळीच्या तळाला व मध्यवर्ती भागात काय आहे तर दलदल, हिंस्त्रपणा! चिखलात कमळ उमलते म्हणून चिखलाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मानवी जीवनाचे कमळ हे चिखलातून उमललेले आहे आणि या कमळाचे बंध चिखलाशी कायम आहेत. पर्यावरणीय साखळीतून मनुष्य उत्क्रांत झाल्यावर त्याची पुढील प्रगती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे चाललेला अविरत प्रवास! सृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे असला तरी प्रकाशाचा पायाच मुळी अंधार आहे म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे हे विसरून कसे बरे चालेल?
(४) पण माणूस जरी प्रकाशात आला असला तरी अंधाराने त्याची पाठ सोडलेली नाही. हे म्हणजे चिखलाने कमळाची पाठ न सोडणे असे आहे. हे असे आहे की, निसर्गातील देवाने मनुष्याला स्वर्गात आणून सोडले तरी त्याला नरकापासून मुक्त केले नाही, प्रकाशात आणले तरी अंधारापासून मुक्त केले नाही व नैतिकतेचा सुगंध दिला तरी अनैतिकतेच्या दुर्गंधीपासून मुक्त केले नाही. तसे नसते तर मग आपल्या समाजाची रचना जातीपातीच्या उतरंडीवर उभी राहिली नसती, कायदेशीर अर्थव्यवस्थेबरोबर बेकायदेशीर समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली नसती व सुसंस्कृत समाजात अंडरवर्ल्डची उपस्थिती दिसली नसती.
(५) मानवी वस्तीची निर्मिती जंगलाशेजारीच झाली आहे. मानवी वस्तीला स्वर्ग व जंगलाला नरक मानले तर मग नरक हाच स्वर्गाचा शेजारी आहे असे मान्य करावे लागेल. पण जंगलांना नरक मानून जंगले नष्ट करता येतील का? तसे केले तर जंगलातील जैव विविधता नष्ट होईल व हवेतील प्राणवायू व पाऊसपाणी नष्ट होऊन मनुष्याचे जगणेच अशक्य होईल. सत्य काय तर अंधाराशिवाय प्रकाश नाही, जंगलाशिवाय मनुष्य जीवन नाही, चिखलाशिवाय कमळ नाही व अनैतिकतेशिवाय नैतिकता नाही. म्हणजेच नरकाशिवाय स्वर्ग नाही. स्वर्गाची वाट नरकातून जाते जशी गुलाबाची वाट काट्यांतून जाते. हेच तर निसर्गाचे वैज्ञानिक सत्य आहे. नरक हाच स्वर्गाचा पाया हेच ते आश्चर्यकारक नैसर्गिक सत्य!
(६) नरकापासून जशी स्वर्गाची मुक्ती नाही तशी अनैतिकतेपासून नैतिकतेची मुक्ती नाही. खरं तर अनैतिकतेच्या पायावरच मानवी नैतिकतेचा डोलारा उभा आहे. अर्थात मानवी नैतिकतेची इमारत अनैतिकतेच्या मूलभूत पायापासून अलग करता येणार नाही जसे मनुष्य जीवन हे जंगलापासून अलग करता येणार नाही. पण नरक व स्वर्ग, जंगल व मनुष्य जीवन व तसेच अनैतिकता व नैतिकता यांना आपआपल्या मर्यादा आहेत. निसर्गातील देवाने कोणालाही अमर्यादित स्वातंत्र्य बहाल केलेले नाही. प्रत्येक जण वाजवी मर्यादांच्या बंधनात आहे.
(७) निसर्गातील देवाने घालून दिलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा जो कोणी ओलांडेल त्याचा विनाश अटळ आहे. त्यापासून स्वर्ग व नरक, प्रकाश व अंधार, नैतिकता व अनैतिकता या दोन्ही गोष्टी मुक्त नाहीत. म्हणून मानवी वस्तीने जंगले तोडू नयेत, जंगलावर अतिक्रमण करू नये. पण मानवी वस्तीच्या शेजारी जंगल कायम राहणार हे नक्की! कारण जंगल हाच मनुष्य जीवनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या शेजारी शेजारी राहणार. त्यातून माणसे अधूनमधून जंगलात जाण्याचे धाडस करणार व जंगली जनावरे सुद्धा मानवी वस्त्यांत येण्याचे धाडस करणार. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या यांच्या सीमारेषा निश्चित करून मध्ये कुंपण हे घातलेच पाहिजे. असे कुंपण हीच दोन्हीमधील मर्यादेची लक्ष्मणरेषा असेल.
(८) या लेखाचे तात्पर्य काय, तर मनुष्याला त्याच्या आयुष्यात पूर्ण सुख व शांती लाभूच शकत नाही. कारण स्वर्गाचा पायाच मुळी नरक आहे. या पायाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कमळाला चिखलाकडे दुर्लक्ष करून चालेल का? पण म्हणून काय कमळाने चिखलाला सतत घाबरून रहावे? तसेच सद्या आलेल्या कोरोना महामारीचे आहे. हा कोरोना विषाणू कुठून आला? जंगलातून आला की मानवी वस्त्यांतच तयार झाला याचा शोध घेताना हेही ध्यानात ठेवले पाहिजे की सद्याचा कोविड-१९ हा कोरोना विषाणू निघून गेला किंवा नष्ट केला गेला तरी पुन्हा अशा प्रकारचे विषाणू निर्माण होणारच नाहीत असे नाही. याचे कारण म्हणजे स्वर्गाला कायम नरकाची सोबत आहे व मानवी वस्त्यांना कायम जंगलाची सोबत आहे.
(९) सद्या तरी कोरोनाची दहशत भयंकर आहे. मास्क लावून बाजारात फिरताना माणसे पूर्वीसारखी आनंदी दिसत नाहीत. वातावरणात उदासीनता आहे. कारण कोरोनाचा दंश भयंकर आहे. त्याचे विष उतरून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना निगेटिव्ह झाला तरी अशा रूग्णाला सोडून जाताना कोरोना रूग्णाचे अवयव फार अशक्त करून जातो. एकप्रकारचे अपंगत्वच ते! काही माणसे कोरोनातून मुक्त झाल्यावरही अवयव अशक्त व पुढे निकामी झाल्याने मृत्यू पावतात. प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे काल ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले ते कोरोनामुक्त झाल्यानंतर! का तर कोरोना दंशाने त्यांची फुफ्फुसे व इतर अवयव निकामी झाले म्हणून. हे सर्व भयंकर आहे.
(१०) निसर्गातील देवाने मनुष्याला पर्यावरणीय साखळीच्या सर्वोच्च पदावर आणून खरंच स्वर्ग दाखवला म्हणून त्या देवाचे आभार मानणे हे योग्यच होय. पण याच देवाने या स्वर्गाचा पाया नरक आहे हे निश्चित करून नरकापासून स्वर्ग मुक्त नाही हे मनुष्याला बजावले आहे. हा देव याच पायाभूत नरकातून मनुष्यापुढे कायमच काहीना काहीतरी जगण्याची आव्हाने, संकटे निर्माण करीत असतो. त्याबद्दल या देवाला काय म्हणावे? मनुष्याने त्याचे आभार मानावेत की अशा संकटांशी लढण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना करावी?
-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०