मरण कसे यावे?
मरण म्हणजे जगण्याच्या संघर्षातून सुटका अर्थात मुक्ती आणि पुढे चिरशांती! मग ते शांत नको का असायला? जन्माला यायच्या अगोदर बाळ आईच्या पोटात असते तेंव्हा किती शांतता उपभोगत असेल नाही! आईच्या अन्नातून अन्न, पाण्यातून पाणी व श्वासातूनच श्वास आणि तो आईच्या पोटातच घ्यायचा म्हणजे जगण्यासाठी लागणारी कसली कटकटच नाही. मेल्यावर आपल्या मनाची कवाडे कायमची बंद होतात व आपले मृत शरीर अनंतात विलीन होते. अनंत असलेले विश्व हे जणू काही आईचे पोटच! त्या पोटात शिरायचे व तिथेच विलीन व्हायचे आणि चिरशांती उपभोगायची! किती छान कल्पना! आत्मा नाही, स्वर्ग नाही की नरक नाही. फक्त चिरशांती! मेल्यावर ही चिरशांती सगळ्यांनाच म्हणजे पापी व पुण्यवान दोघांनाही मिळते असे मला वाटते. पुण्यवान माणसांना स्वर्ग व पापी माणसांना नरक असे असते काय? माझा तरी या कल्पनेवर विश्वास नाही. पुण्य कर्माचे चांगले फळ मिळवायचे व पाप कर्माची वाईट शिक्षा भोगायची या दोन्हीही गोष्टी याच इहलोकात! या लेखाचा विषय मरण कसे यावे हा आहे. जसा जन्म सहज व्हावा तसे मरण सुद्धा सहज यावे. हल्ली उठसूठ सिझेरियन बाळंतपणे करतात. बाळ अडले वगैरे तर सिझेरियन करणे ठीक! पण हल्ली सिझेरियनची बाळंतपणे खूप होऊ लागल्याचे दिसत आहे. माझ्या आईची चार बाळंतपणे झाली पण अगदी सहज! एक बहीण तर घरातच झाली. माझ्या बायकोचे बाळंतपण कुर्डुवाडी सारख्या छोट्या खेडे शहरात सहज झाले. मी हे म्हणतोय की जन्म सहज व्हावा व मरणही सहज यावे. बाकी जीवन जगायचा संघर्ष हा तर पाचवीलाच पुजलेला! मरण सहज यावे म्हणजे कसे यावे? तर झाडाची पिकलेली पाने जशी सहज गळून पडतात तसे सत्तरी ओलांडल्यावर पिकल्या पानासारखे मरण यावे. काय ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, कृत्रिम श्वासावर जगवण्याचा प्रयत्न करणे! वृध्दावस्था आणि त्यावर पुन्हा अशी हॉस्पिटल वारी! मला तर धडकीच भरते या गोष्टी बघून! सिझेरियन शिवाय जन्म व्हावा व हॉस्पिटलशिवाय घरीच पिकल्या पानासारखे नैसर्गिक मरण यावे. तसेच मेल्यावर मृतदेहावर जे अंत्यसंस्कार केले जातात ते सुद्धा अगदी साग्रसंगीत केले जावेत ही माझी वैयक्तिक इच्छा! माझे वडील २००९ साली गेले तेंव्हा त्यांना स्मशानात घेऊन जाण्यासाठी खूप नातेवाईक व मित्र मंडळी जमा झाली होती. ते गिरणी कामगारांचे पुढारी होते म्हणून असेल. पण त्यांच्या मृत शरीराला पाण्याने धुणे, त्यावर हार फुले घालणे, लाकडाच्या ताठीवर झोपवणे, मग नातेवाईकांपैकी चार खांदेकऱ्यांनी खांदा देऊन ताठी खांद्यावर घेऊन अंत्ययात्रा हळूहळू चालत चालत स्मशानभूमीत नेणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या बाबतीत झाल्या. पण माझ्या आईला व धाकट्या भावाला मात्र अशी खांदे देणारी अंत्ययात्रा नशिबी आली नाही. हारफुले, ताठी होती. पण ती ताठी ॲम्ब्युलन्समधून बदलापूरच्या स्मशानभूमीत न्यावी लागली. याचे कारण काय तर राहण्याचे ठिकाण बदलापूर पूर्वेकडील एका लांबच्या कोपऱ्यात तर ती स्मशानभूमी बदलापूर पश्चिमेकडील नदीकाठी असलेल्या दुसऱ्या लांबच्या कोपऱ्यात! एवढे लांब चालणारे खांदेकरी मिळायला हवेत ना! मृत शरीराचे वजन किती हाही महत्त्वाचा भाग असतोच खांदे देताना. म्हणून निवासस्थान हे स्मशान भूमीपासून जवळ असले तर ते सोयीचे होते अशा खांदे देणाऱ्या अंत्ययात्रेसाठी! हल्ली तर काय कोरोनाने मरणाची व अंत्यसंस्काराची पुरती वाटच लावून टाकली आहे. कोरोना झालाय या भीतीनेच रूग्ण अर्धमेला होतो व नातेवाईक गर्भगळित होतात. मग असा रूग्ण मेला की त्याला प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्याची रवानगी ॲम्ब्युलन्समधून सरळ इलेक्ट्रिक स्मशानभूमीत! तिथे कोणी जवळचे नातेवाईक हजर नसतात. मग तो मृतदेह त्या प्लास्टिक कव्हरसह विद्युत दाहिनीत ढकलला जातो. पुढे त्या भट्टीत तो मृतदेह प्लास्टिक कव्हरसह जळतो. त्यानंतर त्या मृतदेहाची हाडे व राख गोळा केली जाते का? नदीत किंवा समुद्रात त्या हाडांचे, राखेचे विसर्जन करण्याचा तर प्रश्नच उरत नाही अशा परिस्थितीत! पण मला कळत नाही की, जर कोरोना विषाणू हा कोरोनाग्रस्त जिवंत माणसाच्या श्वासातून, शिंकण्यातून इतरांना होतो तर मग कोरोनाग्रस्त माणूस मेल्यावर त्याचा मृतदेह असा श्वास सोडत नसताना, शिंकत नसताना त्या मृत देहाला लोक एवढे घाबरतात का? सामान्य माणसे सोडा, पण डॉक्टर्स, नर्स सुद्धा? हे सगळं समजण्याच्या पलिकडे गेलेय. काय ही त्या मृतदेहाची हेळसांड व चेष्टा! एवढी जबरदस्त भीती निर्माण केली गेलीय की नातेवाईकांना जवळही जाता येत नाही त्या मृतदेहाजवळ! आता मी माझ्या मरणाकडे वळतो. माझे ६४ वय झालेय. माझे वडील ७९ वर्षे जगले. मीही तेवढा जगलोच पाहिजे अशी काही माझी तीव्र इच्छा नाही. पण माणूस पिकल्या पानासारखा सहज नैसर्गिक मेला पाहिजे या मतावर मात्र मी ठाम आहे. आता ६४ वयात माझे पान हे ७५ टक्के पिकलेय व २५ टक्के हिरवे आहे. माझ्या पानाचा देठ तर मस्त हिरवागार आहे. मग मी या वयात पिकल्या पानासारखा अगदी सहज कसा मरू शकतो? मला तर अगदी पिकल्या पानासारखेच मरायचेय! दुसरी इच्छा ही की, माझे पिकले पान सहज गळून पडल्यावर मग माझ्या मृतदेहाला माझ्या वडिलाप्रमाणेच काही जवळच्या नातेवाईकांनी खांद्यावर उचलून स्मशान भूमीत घेऊन जावे. डोंबिवली (पूर्व) येथील माझे निवासस्थान इथल्या स्मशानभूमी पासून तसे फार दूर नाही. खांद्यावर अंत्ययात्रा जाण्याला सुद्धा मोठे नशीब असावे लागते काय? पंढरपूरला प्राथमिक शाळेत असताना मी शाळेला दांड्या मारून चंद्रभागा नदीकाठी उनाडक्या करायला जायचो तेंव्हा शिक्षकांच्या हुकूमावरून वर्गमित्र मला त्यांच्या खांद्यावर माझ्या शरीराची जिवंत तिरडी करून शाळेत घेऊन जायचे. मग मी मेल्यावर माझी तशी तिरडी का नको? मला कोणी तसे खांदेकरी मिळणारच नाहीत का?