https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

इहवाद Materialism

विवेकी इहवाद? Rational materialism?

(१) आभासी/मिथ्या आध्यात्मिकतेला पर्याय विवेकी भौतिकता?

(1) Rational/Reasoned/Judicious materialism as substitute for superstitious or mythological spiritualism?

(२) त्यासाठी आध्यात्मिकता ही आभासी/मिथ्या आहे हे विवेकी भौतिकतेला पुरावा व कारणमीमांसा देऊन सिद्ध करावे लागेल.

(2) For that rational materialism will have to prove spiritualism as fantasy or myth by giving convincing proof and reason.

(३) मूलभूत प्रश्न हा आहे की भौतिक निसर्गात आध्यात्मिक देव कसा व माणसाच्या भौतिक शरीरात आध्यात्मिक आत्मा की भौतिक मन?

(3) How can there be spiritual God in material Nature and spiritual soul in material human body instead of material human mind?

-ॲड.बी.एस.मोरे©१२.८.२०२०
-Adv.B.S.More©12.8.2020

मुंबईतील सिनेमागृहे!

मुंबईची सिनेमागृहे आणि मी!

ताडदेवचे गंगा जमुना हे जुळे सिनेमागृह जमीनदोस्त झाले. वाईट वाटले ही बातमी वाचून कारण कॉलेज जीवनात परळचे दिपक, वरळीचे गीता, सत्यम-शिवम-सुंदरम, हाजीअलीचे लोटस, दादरचे प्लाझा, मुंबई सेंट्रलचे मराठा मंदिर, ग्रँट रोडचे नॉवेल्टी, अप्सरा, मिनर्व्हा व आता जमीनदोस्त केलेले ताडदेवचे गंगा, जमुना या सिनेमागृहांत मी भरपूर हिंदी चित्रपट बघितले आहेत.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.८.२०२०

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

निसर्गाचे सत्य व माहिती अधिकार!

मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग!

विविध गुणधर्मी मूलद्रव्यांच्या अनेक पदार्थ कणांनी बनले विविध गुणधर्मी अनेक पदार्थ, त्या पदार्थांची बनली व्यवस्था आणि माणूस झाला या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग! या अनेक पदार्थांच्या समूहाला विश्व किंवा निसर्ग म्हणायचे आणि या पदार्थांच्या समूह व्यवस्थेला म्हणायची विश्व किंवा निसर्ग व्यवस्था! हे पदार्थ  कण, पदार्थ व त्यांची व्यवस्था यांचे ज्ञान हेच तर विज्ञान! या पदार्थ कणांशी, पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी प्रस्थापित झालेल्या  मानवी संबंधाविषयीचे ज्ञान हे सुद्धा विज्ञानच! निसर्गातील विविध पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी असलेला मानवी संबध नीट समजून घेणे म्हणजे निसर्ग व मानव संबंधाचे विज्ञान समजून घेणे. मनुष्य जेंव्हा हे विज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणतो तेंव्हा त्याला तंत्रज्ञान म्हणतात. मानवी समाज व या समाजाची कायदा व्यवस्था हा सुद्धा या विज्ञान व तंत्रज्ञानाचाच भाग आहे. निसर्गाच्या विज्ञानाला मानवाने दिलेला नैसर्गिक  प्रतिसाद म्हणजेच तंत्रज्ञान होय! निसर्गाच्या या सत्याबरोबर त्या सत्य स्वरूपात जगायचे की काल्पनिक, आभासी स्वरूपात जगायचे हे माणसाने त्याच्या बुद्धीचा नीट वापर करून ठरवावे. निसर्गाचे विज्ञान व मानव समाजाचा कायदा, धर्म या दोन गोष्टी वेगळ्या करणे हेच मुळात चुकीचे आहे. धर्म व कायदा यात सुद्धा फरक करणे चुकीचे आहे. धर्मात जेंव्हा असत्य मिथ्यके, कल्पना व आभास घुसवले जातात तेंव्हा धर्म विज्ञान व कायद्यापासून अलग होतो व असे अलगीकरण हे मानवाला निसर्गाच्या सत्यापासून दूर नेत त्याला निसर्गाच्या नैसर्गिक सादाला नैसर्गिक प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण करते. मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग आहे हे लक्षात घ्यायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©११.८.२०२०

नैसर्गिक वर्तन!

कोरोना आणि माणसाचे नैसर्गिक वर्तन?

(१) माणूस ना पूर्ण वासनिक ना पूर्ण भावनिक, ना पूर्ण भौतिक ना पूर्ण आध्यात्मिक, ना पूर्ण वैज्ञानिक ना पूर्ण धार्मिक व ना पूर्ण ज्ञानी ना पूर्ण अज्ञानी! अशा अर्धवट माणसाकडून पूर्ण नैसर्गिक वर्तन शक्य आहे का हा मला पडलेला एक मूलभूत प्रश्न! निसर्गाच्या नैसर्गिक सादाला पूर्णपणे नैसर्गिक प्रतिसाद देण्याच्या मानवी कृतीलाच मानवाचे पूर्ण नैसर्गिक वर्तन म्हणता येईल.

(२) माणूस हा असा अपूर्ण, अर्धवट असल्याने त्याने शासन व्यवस्थेचे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ असे तीन तुकडे केले व हे तीन तुकडे एकमेकांवर अंकुश ठेवीत कायदा व न्याय यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण खरंच यात हे तीन तुकडे यशस्वी झालेत का? जगातून अन्याय संपलाय का? हजारो कायदे व लाखो न्यायनिवाडे, बापरे मला धडकीच भरते यांच्या भरतीकडे बघत!

(३) निसर्गाने माणसाला अपूर्ण, अर्धवट ठेऊन त्याच्यापुढे नैसर्गिक वागण्याचे आव्हान उभे केलेय. मानवी वर्तन, मग ते शैक्षणिक असो, आर्थिक असो की राजकीय असो, ते खरोखरच नैसर्गिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. याचे कारण म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात नैसर्गिक न्याय लपला आहे. 

(४) पण माणसाला निसर्गाशी पूर्णपणे समरस होत पूर्णपणे नैसर्गिक वर्तनातून नैसर्गिक न्याय मिळविणे शक्य झालेय का? त्यासाठी बुद्धीमान  माणसाला निसर्गाचे पूर्ण ज्ञान नको का? पण निसर्गाचे असे पूर्ण ज्ञान कोणत्याच माणसाला नसते आणि मग अशा अर्ध ज्ञानातून सुरू होतो तो सावळागोंधळ व अन्याय! सद्या कोरोनाच्या बाबतीत असेच काहीसे वाटत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

माणूस कुठे हरवलाय?

माणूस कुठे हरवलाय?

शरणागत होऊन अन्याय सहन करीत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायापुढे आत्महत्या करणे किंवा योद्धा होऊन अन्याय सहन न करता अन्यायाविरूद्ध लढत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायाचा खून करणे या दोन टोकांमध्ये माणसाचे अमूल्य जीवन कुठेतरी हरवलेय. या दोन टोकांमध्येच जगा व जगू द्या या न्याय धोरणाचे कुठे तरी तीन तेरा वाजलेत. या दोन टोकांमध्येच न्यायाने जगण्याचे अर्थकारण व अन्यायाविरूद्ध नेटाने लढण्याचे राजकारण अधांतरी लटकलेय.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

अमन (शांती)!

अमन (शांती)!

(१) कोरोना महामारीला अजून एक वर्षही पुरे झाले नाही. पण संपूर्ण जगाला अशांत करणारे दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ ते १९४५ काळात एकूण सात वर्षे चालू होते. या महायुद्धाचा शेवट अत्यंत भयानक अशा विध्वंसाने झाला.  दिनांक ६ अॉगष्ट, १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला व ते शहर बेचिराख केले. त्यानंतर तीन दिवसांनी दिनांक ९ अॉगष्ट, १९४५ रोजी जपानच्याच नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकून  ते शहरही बेचिराख केले. या अणुस्फोटात लाखो माणसे मेली. या भयंकर अणुबॉम्बच्या विध्वंसक शक्तीचा धसका घेऊन जपानने दिनांक १५ अॉगष्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली व दुसरे महायुद्ध समाप्त झाले. अशाप्रकारे मानवनिर्मित विध्वंसाने जगात शांतता प्रस्थापित झाली. पण त्यातून एक विचित्र बोध जगातील राजकारणी मंडळींनी घेतला आणि तो म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर हिंसा, विध्वसांच्या भीतीनेच जगात शांतता निर्माण होऊ शकते. मग जगात विनाशकारी अण्वस्त्रे निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा अजूनही चालूच आहे. यातून जग भीतीच्या प्रचंड दडपणाखाली जगतेय व ही भीती जगात निर्माण होणाऱ्या असंख्य रोगजंतू व विषाणू पेक्षाही फार मोठी आहे. म्हणजे जगाची शांती ही आता ना अर्थकारणी लोकांच्या हातात ना डॉक्टर, वकील, न्यायाधीशांच्या हातात! ती शांती आता आहे महत्वाकांक्षी राजकारणी लोकांच्या हातात! जगातील जनतेचे भवितव्य राजकारणी मंडळींच्याच हातात आहे याचा विसर पडू देता कामा नये.

(२) याच सत्यावर प्रकाश टाकीत जगातील शांततेसाठी राजकीय नेतेमंडळींची विनवणी करणारा १९६७ साली प्रदर्शित झालेला "अमन" हा जुना हिंदी चित्रपट मी काल झी क्लासिक टी.व्ही वाहिनीवर पाहिला. यात एक भारतीय डॉक्टर जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावरील अणुबॉम्बच्या अणुकिरणांमुळे जपानी बंधू भगिनींना झालेले वेदनादायी आजार बरे करण्यासाठी जपानला जाऊन खूप धैर्याने वैद्यकीय सेवा देतो व तिथेच मृत्यूमुखी पडतो. असेच एक भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस १९३८ साली झालेल्या चीन व जपान युद्धात चीनमध्ये तिथल्या रूग्णांवर इलाज करण्यासाठी गेले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे भारतीय डॉक्टरांनी चीन व जपान या दोन्ही देशांना स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन वैद्यकीय सेवा पुरवली. पण जोपर्यंत जगातील राजकारणी मंडळी जगातील विध्वंसक शस्त्रात्रे नष्ट करून युद्धखोरीला कायम विश्राम देत अहिंसेचा मार्ग स्वीकारत नाहीत तोपर्यंत या डॉक्टर मंडळीच्या प्रयत्नांना अर्थ उरणार नाही व जगात अमन (शांती) प्रस्थापित होणार नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

आॕनलाइन संस्कृती पासून अलग!

अॉनलाइन संस्कृतीच्या तावडीत सापडलो नाही याचा आनंद!

(१) कोरोना संकट येण्याच्या अगोदर पासूनच आताची ही अॉनलाइन संस्कृती सुरू झाली होती. प्रत्यक्ष शिक्षण व प्रत्यक्ष व्यवहार यावर पोसलेला मी कंपनी कायदा सल्लागार म्हणून स्थिर होत होतो. त्यावेळी इंटरनेटने पुढे आणलेल्या नवीन इ-कॉमर्स या संकल्पनेशी जुळवून घेताना माझी धांदल उडत होती. या नवसंकल्पनेला कुशीत घेऊनच कंपन्यांमध्ये नोकरीत रूजू झालेल्या कंपनी सेक्रेटरी नामक उच्च अधिकाऱ्यांचे हेटाळणीचे शब्द मला ऐकून घ्यावे लागत होते. मला साधा इमेल कसा पाठवायचा हे माहित नव्हते. मग कायद्याचे दस्तऐवज संगणकावर टाईप करणे शक्यच नव्हते. पण मी कंपनी सेक्रेटरी (इंटर) परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कायदेशीर सल्लागार म्हणून बस्तान बसविणे सोपे गेले. माझे कायद्यातील ड्राफ्टींग याच कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या अवघड अभ्यासाने सुधारले. एलएल.बी. ला असलेला ड्राफ्टींग व प्लिडींग हा एकमेव विषय वाचून माझे ड्राफ्टींग सुधारले नाही. तर त्याचा पाया कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या अभ्यासाने पक्का केला. छापील पुस्तके व वर्तमानपत्रे वाचतच मी घडलो. प्रत्यक्ष थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजा टी.व्ही. वर चित्रपट पाहताना मला कधीच आली नाही. तर सांगायचे काय की या कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षणामुळे व विविध कंपन्यांमध्ये अकौंटस, कॉस्टिंग क्लार्क सारख्या नोकऱ्यांमुळे माझा निरनिराळ्या कंपन्यांत कॉर्पोरेट लिगल ॲडव्हायजर म्हणून शिरकाव झाला व माझ्या ज्ञान व अनुभवाचा विचार केला जाऊन प्रत्येक कंपनी क्लायंटने मला खास लिगल टायपिस्ट कंपनी खर्चाने पुरवला. कारण मला संगणक टायपिंग जमत नाही व अॉनलाइन व्यवहारही कळत नाहीत. मला मिळणाऱ्या या विशेष सुविधेमुळे क्लायंट कंपनीतील कंपनी सेक्रेटरी, चीफ अकौंटट सारखे उच्च अधिकारी जळायचे. पण वकील असल्याने कोर्टात जाऊन कंपन्यांच्या केसेसवर सॉलिसिटर्स व काऊन्सेल्स माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचे काम या उच्च अधिकाऱ्यांना जमत नसल्याने त्यांच्या जळण्याला न जुमानता मी पुढे गेलो.

(२) आता या कोरोना संकटामुळे ही अॉनलाईन संस्कृती इतकी फळफळली आहे की आमच्या सारखी जुनी उच्च शिक्षित मंडळी अॉनलाईन संस्कृतीत रूळलेल्या हल्लीच्या तरूणांना अडाणी वाटू लागलीत. त्यांना प्रत्यक्ष शिक्षण व प्रत्यक्ष व्यवहाराची चव माहित नसल्याने त्याची मजा त्यांना कशी कळणार? असो, हे तरूण आम्हालाही असेच चिडवतील की, तुम्हाला अॉनलाईन काय ते कळत नाही ना मग गप्प बसा! इमेल पाठवणे, फेसबुकवर लिखाण करणे या अॉनलाइन गोष्टी मी आता शिकलोय. पण पोस्टकार्डस वर पत्रे लिहिणे,तसेच परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेनाने प्रश्नपत्रिका सोडवणे, शाळा व कॉलेजात शिक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवाद करीत शिक्षण घेणे, हाताने लिखाण करून अभ्यास वह्या तयार करणे व उजळणी करणे, छापील पुस्तके वाचणे, छापील वृत्तपत्रे वाचणे यातून जे मनन व चिंतन होत होते ते संगणक व मोबाईलच्या अॉनलाईन स्क्रीनवर होणे मला तरी अशक्य आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने गेली पाच महिने घरातच अडकून बसलेली माणसे आता या अॉनलाइन खेळातून हळूहळू बाहेर पडून मास्क लावून, शारीरिक अंतर ठेऊन का असेना पण बाहेर पडू लागलीत, दुकानात जाऊन खरेदी करू लागलीत, रस्त्यावर वडापाव, भजी खात चहा पिऊ लागलीत. कारण लॉकडाऊन हळूहळू सैल होऊ लागलाय. याचा मला खूप आनंद झालाय. कारण लोकांच्या अशा मुक्त फिरण्याने जीवन प्रत्यक्षात कसे जगायचे याचा अनुभव घेता येतोय. पण ती अॉनलाइन संस्कृती मात्र आता रूळतच चाललीय. या नवसंस्कृतीचा भाग न होता तिच्या तावडीतून मी सुटलो याचा मला खूप आनंद आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©८.८.२०२०