https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २५ मे, २०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आपण सर्वजण निसर्ग व्यवस्थेचे व त्या व्यवस्थेअंतर्गत आपण आपल्या बुद्धीने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचे गुलाम आहोत. निसर्ग व्यवस्थेत वाघ हरणाला जबड्यात पकडून ठार मारून खातो तर समाज व्यवस्थेत मूठभर धनदांडगे सर्वसामान्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक करून आणखी धनश्रीमंत व बलदांडगे होतात. ही समाज व्यवस्था निसर्गाच्या बळी तो कानपिळी या निसर्ग नियमावर आधारित निसर्ग व्यवस्थेला पूरक आहे. नैतिकता व कायद्याचे राज्य या संकल्पनेची वरवरची रंगरंगोटी केल्याने निसर्ग व समाज व्यवस्थेतील कटू वास्तव बदलत नाही. इथे बौद्धिक प्रश्न हा आहे की, परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने वाघाच्या जबड्यातील हरणाची सुटका करता येत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय? पण असो, जे आहे ते आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

शुक्रवार, २४ मे, २०२४

काय चाललंय काय?

काय चाललंय काय?

या जगात आजूबाजूला ज्या गोष्टी बघायला मिळतात त्यातून काय चाललंय काय हा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न होतो. कदाचित माझी बुद्धी उतार वयात नीट काम देत नसल्यामुळे असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतील.

या प्रश्नास कारण की, आजूबाजूला जो तमाशा चाललाय त्या तमाशात एखादी प्रसिद्ध नटी साधा नाही तर तब्बल तीनचारशे कोटी रूपयांचा नेकलेस गळ्यात घालून त्याचे जाहीर प्रदर्शन करते. याच तमाशात हजारो कोटीची संपत्ती बाळगणारे प्रसिद्ध खेळाडू, कलाकार त्यांच्या जाहिरातीतून जंगली रमी सारखे आॕनलाईन गेम्स खेळायला लोकांना उद्युक्त करतात.

याच तमाशात एखादा अती श्रीमंत उद्योगपती त्याच्या मुलांच्या लग्नात करोडो रूपयांचा चुराडा करून त्याच्या श्रीमंतीचे जाहीर प्रदर्शन करतो. याच तमाशात एखादा श्रीमंत  उद्योजक त्याच्या लाडक्या पोरास अल्पवयातच महागडी कार खेळणे म्हणून चालवायला देतो. याच तमाशात एखादा खंडणीखोर भाई गळ्यात सोन्याच्या चैनी व बोटांत हिऱ्यांच्या अंगठ्या घालून मिरवतो व अप्रत्यक्षपणे बेकार पोरांना स्वतःचा महान आदर्श घालून देतो. आणि हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत त्याचे खूप कौतुक वाटून सर्वसामान्य माणसे टाळ्या वाजवत बसतात आणि याच महान लोकांच्या गुलामीत पिढ्यानपिढ्या आयुष्य पुढे ढकलत राहतात.

काय चाललंय काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.५.२०२४

गुरुवार, २३ मे, २०२४

विकासाचा फुगा!

विकासाचा फुगा!

आधुनिक माणूस साधनांऐवजी सुविधांत जास्त अडकलेला दिसत आहे. साधनसुविधा शब्दाचा अर्थ मूलभूत नैसर्गिक साधनांना पूरक मदत करणाऱ्या मानवनिर्मित कृत्रिम सुविधा असा आहे. उदा. हवेतील प्राणवायू हे मूलभूत नैसर्गिक साधन तर रूग्णास करण्यात येणारा याच प्राणवायूचा कृत्रिम पुरवठा ही पूरक कृत्रिम सुविधा होय. तसेच मानवी मेंदूची बुद्धिमत्ता हे मूलभूत नैसर्गिक साधन तर संगणक यंत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.,आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ही पूरक कृत्रिम सुविधा होय.

माणसांनी त्यांच्या सोयीसाठी मूळ नैसर्गिक साधनांतून अनेक सुविधा निर्माण केल्या. या सुविधा सतत वाढवत राहण्याचा मानवी बुद्धीला मंत्रचळ (ओसीडी) लागल्याचे दिसत आहे. या सुविधांचा फुगा वाढवणे म्हणजेच मानवी विकास या भ्रमात राहून माणसे हा फुगा फुगवत पुढे चालली आहेत. सुविधांचा विकास फुगा जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणात  पैशाचा साठा वाढवावा लागतो. कारण वाढलेल्या सुविधांची आंतर मानवी देवाणघेवाण करण्यासाठी माणसांना कृत्रिम माध्यम म्हणून पैसा लागतो. 

माणूस या कृत्रिम सुविधांच्या मागे लागून त्याचे नैसर्गिक स्वत्व हरवत चालल्याचे दिसत आहे. सुविधांचा फुगा व पैशाचा भुगा या भुग्यांमध्ये सर्वसामान्य माणसे भरडली जात आहेत. याचे मूलभूत कारण काय तर मूलभूत नैसर्गिक साधने मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींनी स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत. पण भविष्यात कधीतरी सुविधा विकासाचा हा मोठा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. कदाचित असे वाटणे हा माझा या भुग्यातील भ्रम असेल. पण माझ्या या विकास फुग्याच्या लेखाने लोकांना निदान विचार करायला भाग पाडले तरी खूप मिळवले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

ज्येष्ठांची मैत्री?

ज्येष्ठांची मैत्री?

लहान व तरूण वयात वाढलेली मित्र संख्या उतार वयात कमी होते की वाढते? शाळा, कॉलेजातील मैत्री ही अपरिपक्वतेची किनार असलेली मैत्री. पण हेच जुने मित्र वृद्धापकाळी जगाचे प्रगल्भ ज्ञान व जीवनाचा परिपक्व अनुभव बरोबर घेऊन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांना स्वतःचा शहाणपणा सांगण्यात व एकमेकांच्या आयुष्याचा हिशोब मांडण्यात धन्यता मांडतात. कशी वाढेल व टिकेल अशी मैत्री? म्हणून मी स्वतः वयाने ज्येष्ठ असूनही अशा ज्येष्ठ मित्रांनाच काय पण इतर ज्येष्ठ लोकांना सुद्धा टाळतो कारण एकतर त्यांच्या गप्पा म्हणजे एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या किंवा स्वतःच्या शहाणपणाचा गर्व. मी याच गोष्टी साठी फोन संपर्कातील व्हॉटसॲप माध्यम टाळतो कारण समोरच्याला माझा एखादा लेख शेअर करावा तर कदाचित त्याच्या मनात "आलाय मोठा शहाणा" असा भाव निर्माण होण्याची भीती असते. म्हणून मी फेसबुक, लिंकडइन सारख्या समाज माध्यमातून व्यक्त होणे पसंत करतो कारण तिथली मंडळी मला तशी अनोळखी असतात व मी प्रसारित केलेल्या बौद्धिक विचारावर कुणी जास्त शहाणपणा केला तर त्याला तिथल्या तिथे ब्लॉक करण्याची अशा समाज माध्यमावर छान सोय असते. वृद्धापकाळी तुम्हाला तुमचे ज्ञान, अनुभव व बौद्धिक विचार मुक्तपणे शेअर करण्याची जिथे सोय नाही तिथे ज्येष्ठ मैत्री शक्य नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

बुधवार, २२ मे, २०२४

कल्पना विश्वात जगताना!

कल्पना विश्वात जगताना!

जगातील बऱ्याच गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत स्वप्नवत राहतात. त्या प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत व म्हणून या स्वप्नवत गोष्टी आपण कल्पनेत जगत असतो. मी मुंबईत जन्मलो, बालपणाचा काही काळ पंढरपूर वास्तव्यात घालवला असला तरी सगळे आयुष्य मुंबईत जगलो व जगतोय. पण मी अजूनही संपूर्ण मुंबई तिच्या काना कोपऱ्यासह बघितली नाही. मग संपूर्ण महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश त्याच्या  प्राकृतिक व सांस्कृतिक विविधतेसह बघण्याची गोष्ट दूरच. जगाची सफर तर अशक्यच. इथे महाराष्ट्र बघायला पैसा नाही आणि भारत, जग काय बघणार मी. नशीब यु ट्युब, टी.व्ही. च्या माध्यमातून या सर्वांचे थोडे थोडे दर्शन तरी घडतेय. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे व माध्यमातून त्यांचे अप्रत्यक्ष दर्शन घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाला पृथ्वी नीट अनुभवता येत नाही आणि मग अंतराळ विश्वाचा काय अनुभव घेणार? यातील बऱ्याच गोष्टींपासून आपण फार लांब असतो. त्यांच्या विषयी आपल्याला खूप कमी ज्ञान असते. आपल्याला धड पृथ्वी नीट समजत नाही, अंतराळातील ग्रह, तारे आपल्या डोळ्यांना नीट दिसत नाहीत आणि आपण या सर्व विश्व पसाऱ्यात परमेश्वर शोधत बसतो? परमेश्वर या तर्काभोवती आयुष्यभर चाचपडत बसतो? पण तो परमेश्वर शेवटपर्यंत स्वप्नवत राहतो. शेवटी आपणास परमेश्वरा विषयीच्या काल्पनिक जगात जगण्याशिवाय पर्याय नसतो. नास्तिक लोक मात्र परमेश्वर तर्क, कल्पना यापासून स्वतःला दूर ठेवतात. आस्तिक मात्र परमेश्वराचे प्रत्यक्षात दर्शन कधीच घडले नाही तरी त्याच्या श्रद्धेला शेवटपर्यंत धरून राहतात. इथे प्रत्यक्षात असलेल्या जगाचा बराच भाग आपल्याला कल्पनेत जगावा लागतोय मग न दिसणाऱ्या त्या परमेश्वराचे काय घेऊन बसलात? परमेश्वर दिसत नाही, कळत नाही, तो दिसणार नाही व कळणारही नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारा आणि स्वीकारता येत नसेल तर त्यापासून दूर जा पण स्वतःला आनंदी ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

मंगळवार, २१ मे, २०२४

विश्वशक्ती!

उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

निसर्गातील पदार्थांना उर्जा वाहक साधने असे म्हणता येईल. उर्जेची विविध स्वरूपे/प्रकार आहेत व त्यानुसार काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना जवळ करतात तर काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना दूर लोटतात. उदाहरणार्थ, सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनिअम हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) सुवाहक आहेत तर लाकूड, काच, रबर हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) दुर्वाहक आहेत. दुर्वाहक म्हणजे पदार्थ व उर्जा यांची विजोड जोडी व विजोड जोडीचा संसार होत नाही. फुलांमध्ये नरम उर्जा जाणवते तर आगीत गरम उर्जा जाणवते. उर्जेचे स्वरूप/प्रकार वेगळा व उर्जा वाहकही वेगळा असा हा एकंदरीत प्रकार आहे. मानवी शरीर तेच पण तरूण शरीरातील उर्जा व वृद्ध शरीरातील उर्जा यात फरक जाणवतो. शरीर मरते म्हणजे काय होते तर सजीव शरीराने धारण केलेली उर्जा शरीराला सोडून जाते. याच उर्जेने जिवंत शरीरातील हृदय धडधडते, मेंदू कार्यरत राहतो व शरीर सक्रिय होऊन हालचाल करते. अशी ही उर्जा विश्वात आहे व सजीव मानवी शरीरातही आहे. फक्त तिचे स्वरूप तिच्या पदार्थ वाहकानुसार बदलते. विश्व उर्जेला विश्व शक्ती किंवा विश्व चैतन्य असेही म्हणता येईल. देवधर्माचे अध्यात्म या विश्व चैतन्याशी बरेचसे निगडीत आहे. सूर्य एक पदार्थ आहे व त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्व उर्जा धारण केलीय जी सारखी आग ओकतेय व या आगीतून उष्णता, प्रकाश बाहेर पडतोय. पृथ्वी हाही एक पदार्थच आहे व पृथ्वीनेही विश्व उर्जा धारण केली आहे. उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४

भगवान जगन्नाथाचा रथ!

भगवान जगन्नाथाचा रथ!

निसर्गाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताना मी त्याच्याकडे दुभती गाय म्हणून बघतो तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघताना जगन्नाथाचा रथ म्हणून बघतो. खरं तर जगन्नाथ रथाची ही कल्पना माझे फेसबुक मित्र श्री. सुधीर एन. इनामदार (सोलापूर जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त निबंधक) यांनी फेसबुक वर लिहिलेल्या "नोकरीतील मान मरातब" या लेखावरून सुचली.

भगवान जगन्नाथाचा निसर्गरथ मोठा विलक्षण आहे. हा रथ प्रत्यक्षात दिसतो पण या रथात अदृश्य रूपात बसलेला भगवान जगन्नाथ मात्र प्रत्यक्षात दिसत नाही. पण त्याची जाणीव मात्र मनाला अप्रत्यक्षपणे होते. या विलक्षण निसर्गरथाला ओढण्यासाठी जगन्नाथाने दिलेले विविध स्वरूपाचे वैज्ञानिक दोरखंड हेही विलक्षण आहेत. या विविध दोरखंडाचे शिक्षण म्हणजे विविध ज्ञानशाखा. त्यात शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करावे लागते.

विविध दोरखंडाच्या विविध ज्ञान शाखांत शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करणारी आपण माणसे म्हणजे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापक, मंत्री, शासकीय अधिकारी, न्यायाधीश, वकील, कामगार, कर्मचारी, विविध कलाकार, खेळाडू ही सर्व मंडळी जगन्नाथाचा हा निसर्गरथ आयुष्यभर ओढत असतात. जगन्नाथाची ही रथ यात्रा अविरत चालू असते. ती कधी थांबत नाही.

जगन्नाथाचा हा रथ ओढता ओढता जी मंडळी वयानुसार थकतात ती निवृत्त होऊन या रथयात्रेतून बाजूला होतात. त्यांची जागा नव्या दमाची, नव्या उत्साहाची नवीन पिढी घेते. रथयात्रेतून निवृत्त झालेली वृद्ध पिढी नव्या तरूण पिढीकडून जगन्नाथाचा रथ कसा ओढला जातोय हे लांबून बघते व अधूनमधून नव्या पिढीला रथ ओढण्याचे मार्गदर्शन करते. पण ही निवृत्त वृद्ध पिढी रथयात्रेत घुसून नव्या पिढीच्या कामात लुडबूड करीत नाही. अशाप्रकारे नव्या पिढीकडून ओढला जाणारा जगन्नाथाचा महारथ व भगवान जगन्नाथाची रथयात्रा लांबून बघत असतानाच निवृत्त वृद्ध पिढी मृत्यूने संपते व अनंतात विलीन होऊन भगवान जगन्नाथाला जाऊन मिळते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४