https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २२ मे, २०२४

कल्पना विश्वात जगताना!

कल्पना विश्वात जगताना!

जगातील बऱ्याच गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत स्वप्नवत राहतात. त्या प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत व म्हणून या स्वप्नवत गोष्टी आपण कल्पनेत जगत असतो. मी मुंबईत जन्मलो, बालपणाचा काही काळ पंढरपूर वास्तव्यात घालवला असला तरी सगळे आयुष्य मुंबईत जगलो व जगतोय. पण मी अजूनही संपूर्ण मुंबई तिच्या काना कोपऱ्यासह बघितली नाही. मग संपूर्ण महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश त्याच्या  प्राकृतिक व सांस्कृतिक विविधतेसह बघण्याची गोष्ट दूरच. जगाची सफर तर अशक्यच. इथे महाराष्ट्र बघायला पैसा नाही आणि भारत, जग काय बघणार मी. नशीब यु ट्युब, टी.व्ही. च्या माध्यमातून या सर्वांचे थोडे थोडे दर्शन तरी घडतेय. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे व माध्यमातून त्यांचे अप्रत्यक्ष दर्शन घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाला पृथ्वी नीट अनुभवता येत नाही आणि मग अंतराळ विश्वाचा काय अनुभव घेणार? यातील बऱ्याच गोष्टींपासून आपण फार लांब असतो. त्यांच्या विषयी आपल्याला खूप कमी ज्ञान असते. आपल्याला धड पृथ्वी नीट समजत नाही, अंतराळातील ग्रह, तारे आपल्या डोळ्यांना नीट दिसत नाहीत आणि आपण या सर्व विश्व पसाऱ्यात परमेश्वर शोधत बसतो? परमेश्वर या तर्काभोवती आयुष्यभर चाचपडत बसतो? पण तो परमेश्वर शेवटपर्यंत स्वप्नवत राहतो. शेवटी आपणास परमेश्वरा विषयीच्या काल्पनिक जगात जगण्याशिवाय पर्याय नसतो. नास्तिक लोक मात्र परमेश्वर तर्क, कल्पना यापासून स्वतःला दूर ठेवतात. आस्तिक मात्र परमेश्वराचे प्रत्यक्षात दर्शन कधीच घडले नाही तरी त्याच्या श्रद्धेला शेवटपर्यंत धरून राहतात. इथे प्रत्यक्षात असलेल्या जगाचा बराच भाग आपल्याला कल्पनेत जगावा लागतोय मग न दिसणाऱ्या त्या परमेश्वराचे काय घेऊन बसलात? परमेश्वर दिसत नाही, कळत नाही, तो दिसणार नाही व कळणारही नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारा आणि स्वीकारता येत नसेल तर त्यापासून दूर जा पण स्वतःला आनंदी ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

मंगळवार, २१ मे, २०२४

विश्वशक्ती!

उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

निसर्गातील पदार्थांना उर्जा वाहक साधने असे म्हणता येईल. उर्जेची विविध स्वरूपे/प्रकार आहेत व त्यानुसार काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना जवळ करतात तर काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना दूर लोटतात. उदाहरणार्थ, सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनिअम हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) सुवाहक आहेत तर लाकूड, काच, रबर हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) दुर्वाहक आहेत. दुर्वाहक म्हणजे पदार्थ व उर्जा यांची विजोड जोडी व विजोड जोडीचा संसार होत नाही. फुलांमध्ये नरम उर्जा जाणवते तर आगीत गरम उर्जा जाणवते. उर्जेचे स्वरूप/प्रकार वेगळा व उर्जा वाहकही वेगळा असा हा एकंदरीत प्रकार आहे. मानवी शरीर तेच पण तरूण शरीरातील उर्जा व वृद्ध शरीरातील उर्जा यात फरक जाणवतो. शरीर मरते म्हणजे काय होते तर सजीव शरीराने धारण केलेली उर्जा शरीराला सोडून जाते. याच उर्जेने जिवंत शरीरातील हृदय धडधडते, मेंदू कार्यरत राहतो व शरीर सक्रिय होऊन हालचाल करते. अशी ही उर्जा विश्वात आहे व सजीव मानवी शरीरातही आहे. फक्त तिचे स्वरूप तिच्या पदार्थ वाहकानुसार बदलते. विश्व उर्जेला विश्व शक्ती किंवा विश्व चैतन्य असेही म्हणता येईल. देवधर्माचे अध्यात्म या विश्व चैतन्याशी बरेचसे निगडीत आहे. सूर्य एक पदार्थ आहे व त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्व उर्जा धारण केलीय जी सारखी आग ओकतेय व या आगीतून उष्णता, प्रकाश बाहेर पडतोय. पृथ्वी हाही एक पदार्थच आहे व पृथ्वीनेही विश्व उर्जा धारण केली आहे. उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४

भगवान जगन्नाथाचा रथ!

भगवान जगन्नाथाचा रथ!

निसर्गाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताना मी त्याच्याकडे दुभती गाय म्हणून बघतो तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघताना जगन्नाथाचा रथ म्हणून बघतो. खरं तर जगन्नाथ रथाची ही कल्पना माझे फेसबुक मित्र श्री. सुधीर एन. इनामदार (सोलापूर जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त निबंधक) यांनी फेसबुक वर लिहिलेल्या "नोकरीतील मान मरातब" या लेखावरून सुचली.

भगवान जगन्नाथाचा निसर्गरथ मोठा विलक्षण आहे. हा रथ प्रत्यक्षात दिसतो पण या रथात अदृश्य रूपात बसलेला भगवान जगन्नाथ मात्र प्रत्यक्षात दिसत नाही. पण त्याची जाणीव मात्र मनाला अप्रत्यक्षपणे होते. या विलक्षण निसर्गरथाला ओढण्यासाठी जगन्नाथाने दिलेले विविध स्वरूपाचे वैज्ञानिक दोरखंड हेही विलक्षण आहेत. या विविध दोरखंडाचे शिक्षण म्हणजे विविध ज्ञानशाखा. त्यात शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करावे लागते.

विविध दोरखंडाच्या विविध ज्ञान शाखांत शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करणारी आपण माणसे म्हणजे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापक, मंत्री, शासकीय अधिकारी, न्यायाधीश, वकील, कामगार, कर्मचारी, विविध कलाकार, खेळाडू ही सर्व मंडळी जगन्नाथाचा हा निसर्गरथ आयुष्यभर ओढत असतात. जगन्नाथाची ही रथ यात्रा अविरत चालू असते. ती कधी थांबत नाही.

जगन्नाथाचा हा रथ ओढता ओढता जी मंडळी वयानुसार थकतात ती निवृत्त होऊन या रथयात्रेतून बाजूला होतात. त्यांची जागा नव्या दमाची, नव्या उत्साहाची नवीन पिढी घेते. रथयात्रेतून निवृत्त झालेली वृद्ध पिढी नव्या तरूण पिढीकडून जगन्नाथाचा रथ कसा ओढला जातोय हे लांबून बघते व अधूनमधून नव्या पिढीला रथ ओढण्याचे मार्गदर्शन करते. पण ही निवृत्त वृद्ध पिढी रथयात्रेत घुसून नव्या पिढीच्या कामात लुडबूड करीत नाही. अशाप्रकारे नव्या पिढीकडून ओढला जाणारा जगन्नाथाचा महारथ व भगवान जगन्नाथाची रथयात्रा लांबून बघत असतानाच निवृत्त वृद्ध पिढी मृत्यूने संपते व अनंतात विलीन होऊन भगवान जगन्नाथाला जाऊन मिळते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४

निसर्ग एक दुभती गाय!

निसर्ग एक दुभती गाय!

निसर्ग हा कोणाला परमेश्वर वाटतही असेल. पण मी निसर्गाला दुभत्या गायीच्या रूपात बघतो. निदान पृथ्वी तरी मला दुभती गाय म्हणजे गोमाता वाटते जी तिच्या लेकरांना सतत दूध देऊन त्यांना उपाशी मरू देत नाही.

या दुभत्या गायीचे दूध काढणारी व पिणारी असंख्य माणसे पृथ्वीवर जन्मतात, दूध पिऊन जगतात व शेवटी जीवनचक्रात मरतात. पण गाय मात्र आहे तिथेच दूध पुरवत कायम आहे. पण हळूहळू मनुष्य नावाच्या तिच्या लेकरांची संख्या वाढत गेली. अर्थात लोकसंख्या वाढत गेली आणि तिच्या लेकरांत तिचे दूध काढण्याची (उत्पादन कामाची) व ते दूध पिण्याची (उपभोग घेण्याची) स्पर्धा वाढत गेली.

तिच्या लेकरांना तिनेच बुद्धी दिलीय. पण ही लेकरे निर्बुद्ध होऊन हावरट झाली व मर्यादेच्या बाहेर जाऊन  त्यांची लोकसंख्या व स्पर्धा वाढवत गेली. बेअक्कली कुठली. त्यांच्या जन्मदात्या व पोषणकर्त्या आईलाही तिच्या मर्यादा आहेत एवढी साधी अक्कल असू नये या हावरट पोरांना.

यातली काही शहाणी, अतीशहाणी पोरं तर मूळ प्रश्न समजून घेऊन त्याचे मूळ उत्तर शोधायचे सोडून एकमेकांना बुड नसलेली तत्वज्ञाने पाजळत, वरवरचे उपदेश करीत फिरत आहेत.

ही पोरं म्हातारी झाल्यावर मात्र दूध काढण्याच्या व दूध पिण्याच्या या स्पर्धेतून निवृत्त होऊन शांत होतात. पण त्यांनी निर्माण केलेली पोरं पुन्हा नव्या उमेदीने व मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेऊन या आईला हवे तसे ओरबाडण्यास सुरूवात करतात. धन्य धन्य या पोरांची!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.५.२०२४

सोमवार, २० मे, २०२४

मला त्यावेळी खरंच करोना झाला होता का?

मला खरंच त्यावेळी करोना झाला होता का?

करोना कहर काळात मी चांगला धडधाकट होतो. कसलाच थंडी, ताप, खोकला, अंगदुखी काहीच नव्हते. पण मला मस्ती म्हणून मी डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर करोना टेस्ट करणाऱ्या पोरांजवळ गेलो आणि करा माझी टेस्ट असे त्यांना बिनधास्त म्हणालो. कारण मला करोना निघणारच नाही अशी माझी खात्री होती. त्या पोरांनी माझ्या नाकात एक काडी खुपसली. माझ्या नाकाला झिणझिण्या आल्या आणि मी शिंकलो. मग त्या पोरांनी ती काडी एका मशीन मध्ये घातली आणि थोड्या वेळाने मला सांगितले "अहो काका, करोना पाॕजिटिव्ह रिपोर्ट आहे, आता सरकारच्या आरोग्य खात्यात तुमचे नाव दाखल झाले, तुम्ही सरकारी रूग्णालयात दाखल व्हा नाहीतर अॕम्ब्युलन्स घरी येऊन तुम्हाला उचलून नेतील". हे ऐकून मी जाम टरकलो. माझी मस्ती माझ्या अंगाशी आली. अशाप्रकारे माझ्या स्वतःच्या मस्तीमुळे करोना रूग्ण म्हणून मी तावडीत सापडलो. आता काही इलाज नव्हता. मग मी सरळ सरकारी रूग्णालयात गेलो. तिथे रांगेत बरीच माणसे उभी होती. माझा नंबर आल्यावर मी डॉक्टरला म्हटले की "अहो डॉक्टर, त्या रेल्वे पुलावरील पोरांनी माझी करोना टेस्ट करताना नीट काळजी घेतलेली दिसत नाही, मी तर तब्बेतीने चांगला आहे, काहीतरी गडबड झाली असेल त्या पोरांकडून, तुम्ही तर डॉक्टर आहात, डबल चेक म्हणून तुम्ही माझ्या नाकात पुन्हा ती काडी घालून दुसरी करोना टेस्ट करा ना माझी"! डॉक्टर म्हणाले "काही गरज नाही, तुम्हाला करोना आहे, पण घाबरायचे कारण नाही, टॕब्लेट ब्लॕक गोल्ड, टॕब्लेट सी व्हिटॕमिन व टॕब्लेट डी३ कॕल्शियम या तीन गोळ्या पंधरा दिवस घ्यायच्या, घरात स्वतःला कोंडून घ्यायचे, घरात बायको आहे ना मग तिच्यापासून अंतर ठेवायचे, तिच्याकडून आतल्या दरवाजातून जेवणाचे ताट घेऊन हॉलमध्ये फक्त  एकट्याने जेवायचे, बाहेर जायचे नाही कारण तुमच्या करोनाचा संसर्ग इतरांना होईल, पंधरा दिवसांनंतर दाखवायला या"! झाले माझी घर कैद (क्वाॕरंटीन) सुरू झाली. घरात मी मस्त आराम करीत होतो. टी.व्ही. वर पिक्चर्स बघत होतो. खरं तर तेव्हा मला काहीच झाले नव्हते. मी ठणठणीत होतो. ११ डिसेंबर २०२० रोजी त्या रेल्वे पुलावरील पोरांनी माझ्यावर करोना पाॕजिटिव्ह म्हणून शिक्का मारला आणि त्यानंतर मी  स्वतःला १५ दिवस कैद (क्वाॕरंटीन) करून घेतले. त्या तीन टॉनिकच्या सरकारी गोळ्या १५ दिवस घराच्या  कैदेत घेतल्यावर २६ डिसेंबर २०२० रोजी त्या सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी मला न तपासताच वरवर बघून मी करोना मुक्त झालो असे सरकारी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते प्रमाणपत्र बक्षीस म्हणून रूबाबात खिशात कोंबले व मस्त घरी आलो व नंतर बाहेर मोकळा फिरू लागलो. ही माझी सत्यकथा आहे. त्याचे तत्कालीन वैद्यकीय पुरावे मी या लेखासोबत जोडत आहे. पण मला अजूनही कळले नाही की खरंच मला त्यावेळी करोना झाला होता का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.५.२०२४

रविवार, १९ मे, २०२४

धाकट्या बहिणीला पत्र!

धाकटया बहिणीला थोरल्या भावाचे पत्र!

प्रिय भगिनी,

तुझ्या डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांनी तुला हे जग प्रत्यक्षात कसे आहे हे दाखवले आणि मन नावाच्या तुझ्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने तुला परमेश्वर नावाच्या अलौकिक शक्तीची सहावी जाणीव करून देत अप्रत्यक्ष जाणिवेतला परमेश्वर समोर उभा केला. पण याच परमेश्वराने, तुझ्या तरूण वयात तुझी शक्ती व्यवस्थित असताना, तुझा उत्साह चांगला असताना तुझ्या  जीवनसाथीला म्हणजे तुझ्या पतीला अचानक तुझ्यापासून हिरावून घेतले आणि तरीही या परमेश्वराचे तू गुणगाण गातेस? त्याला उलट जाब का विचारत नाहीस?

ज्यांचे सर्व काही नीट चालले आहे त्यांना खुशाल त्या परमेश्वराची जपमाळ ओढत बसू देत पण तुझे काय? तू आयुष्यात कोणतीही वाईट करणी केली नाहीस. इमाने इतबारे संसार केलास. तुझ्या मुलांना असेल त्या कठीण परिस्थितीत वाढवलेस आणि तरीही हा परमेश्वर तुलाच असली भयानक शिक्षा करतोय? आणि उतार वयातही पुन्हा आणखी त्रास देतोय?

तुझ्या मुलांचा संसार चांगला चाललाय यात आई म्हणून तुला मोठे समाधान असणे हे ठीक आहे. पण या परमेश्वराने तुझा संसार मध्येच मोडला त्याचे काय करायचे? "दो हंसो का जोडा बिछड गयो रे" हे गाणे म्हणत रडत बसायचे का? की त्या परमेश्वराच्या नावाने खडे फोडत बसायचे? दुसरे करतात म्हणून तूही त्यांची री ओढत बसायचे का?

हा परमेश्वर कोणाला चांगला तर कोणाला वाईट. त्याचा थांगपत्ता ना कोणाला लागला आणि ना कोणाला कधी लागेल. याचा अर्थ असा नव्हे की परमेश्वरावर श्रद्धा ठेवू नये. जरूर ठेवावी. पण भोळी, आंधळी श्रद्धा ठेवू नये. चांगली डोळस श्रद्धा ठेवावी. बुद्धीने नीट विचार करून वास्तव नीट समजून घ्यावे. ज्या लोकांची बुद्धी भ्रमिष्ट झालीय अशा लोकांच्या नादी लागू नये. ही माणसे वास्तव नीट समजून न घेता विचित्र वागतात व स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही त्रास देतात जो त्रास कधीकधी फार भयंकर असतो. अशा लोकांचा विचार करून स्वतःचे आयुष्य बिघडवू नकोस. लोकांच्या नाकावर टिच्चून मस्त जग. तुझा जीवनसाथी आता परत येणार नाही. पण सगळं काही संपलेले नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी अजूनही तुझी सोबत करीत आहेत. तुझी चांगली मुले, चांगल्या सुना, चांगली नातवंडे यांचा चांगला गोतावळा व आधार तुला आहे. वृद्धाश्रमातील लोकांचे दुःख तुझ्या वाट्याला आले नाही त्याबद्दल त्या परमेश्वराचे थोडे आभार मान. पण त्याचे जास्त आभार बिलकुल मानू नकोस. कारण याच परमेश्वराने तरूण वयात तुझा जीवनसाथी तुझ्यापासून हिरावून नेलाय. नुसत्या जगाशीच नव्हे तर परमेश्वराबरोबरही व्यवहारी वाग कारण जगाचा व्यवहार त्यानेच निर्माण केलाय. तेव्हा व्यवहारी बन व खंबीर मनाने मस्त जग!

-बाळू दादा, १९.५.२०२४

शनिवार, १८ मे, २०२४

परमेश्वराची अप्रत्यक्ष अनुभूती!

निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव व परमेश्वर शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती!

डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या मानवी शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांतून मानवी मेंदूला निसर्गाची प्रत्यक्षात जाणीव होते अर्थात निसर्ग प्रत्यक्षात अनुभवता येतो, ज्ञात होतो परंतु मानवी शरीराला चिकटलेल्या व मानवी मेंदूशी संलग्न असलेल्या या पाच ज्ञानेंद्रियांशिवाय मानवी मेंदूत आणखी एक सहावे ज्ञानेंद्रिय असते त्याला मन असे म्हणतात. या मनाला पाच ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन जसा निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो तसा या पाच ज्ञानेंद्रियांचा आधार न घेताही अगदी स्वतंत्रपणे निसर्गातील परमेश्वरी शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती मिळू शकते जर मानवी मनाची त्या महान शक्तीवर म्हणजे परमेश्वरावर तेवढी मोठी भावनिक श्रद्धा असेल तर. परमेश्वराची आध्यात्मिक अनुभूती म्हणजे मानवी मनाला होणारे परमेश्वराचे अप्रत्यक्ष ज्ञान. मानवी मनाच्या अशा अप्रत्यक्ष अनुभूतीला किंवा अप्रत्यक्ष ज्ञानाला विज्ञान मान्यता देत नाही कारण अशी अप्रत्यक्ष अनुभूती, अप्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या प्रत्यक्ष अनुभवालाच कायम चिकटून राहणाऱ्या विज्ञानाला परमेश्वर कायम अज्ञात राहिला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.५.२०२४