https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १० जुलै, २०२४

जिवाभावाची मैत्री!

जिवाभावाची मैत्री!

व्यावहारिक संबंध व वैयक्तिक मैत्री यात फरक असतो. व्यावहारिक संबंधातील माणसे व्यवहारात स्वतःच्या फायद्याचाच जास्त विचार करतात. याउलट वैयक्तिक मैत्रीत एकमेकांच्या हिताचा जास्त विचार केला जातो. वैयक्तिक मैत्रीत थोडाफार व्यवहार असूही शकतो व नसूही शकतो. अशा मैत्रीत व्यवहार असला तरी त्यात नुसत्या स्वतःच्या फायद्याचाच विचार नसतो तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ असा एकमेकांच्या हिताचा विचार असतो. अशी मैत्री व्यावहारिक तथा भावनिक अशी संमिश्र असते. पण काही नाती अशी असतात की तिथे एकमेकांचे हित जपण्याचाच विचार होतो. अशी मैत्री ही खूप भावनिक असते. उदा. आईवडिलांचे आपल्या मुलांवरील व मुलांचे आपल्या आईवडिलांवरील प्रेम हे भावनिक असते. त्यामध्ये व्यवहार जवळजवळ नसतोच. असे प्रेम नैसर्गिक असते व अशी मैत्री नैसर्गिक असते. अशी नैसर्गिक मैत्री दीर्घकालीन सहवासाने पती पत्नीतही निर्माण होते. कुटुंबातही थोडाफार व्यवहार असतो. आईवडिलांनी मुलांचे नीट संगोपन केले नाही किंवा पती पत्नीने त्यांची वैवाहिक कर्तव्ये नीट पार पाडली नाहीत तर त्यांच्यात मायाप्रेम, आपुलकीची भावनिक जवळीक कशी निर्माण होईल? कुटुंबाबाहेरील व्यक्तीशी व्यावहारिक संबंध प्रस्थापित झाला नाही तरी वैचारिक मैत्री होऊ शकते. अशा मैत्रीत ज्ञानांक व बुद्ध्यांक समान पातळीवर असणे आवश्यक असते. अशा वैचारिक मैत्रीचे रूपांतर पुढे भावनिक मैत्रीतही होऊ शकते. पण वैचारिक मैत्रीत भावनांक जुळून भावनिक जवळीक निर्माण होणे व ती टिकणे हे तसे दुर्मिळच असते. याचा अर्थ हाच आहे की, कुटुंब सदस्यांबरोबर असलेल्या भावनिक मैत्री एवढी घट्ट भावनिक मैत्री कुटुंबाबाहेरच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी होईलच असे नसते. कुटुंबातील घट्ट भावनिक मैत्रीचा अनुभव अनोखा असतो. अशा मैत्रीत कुटुंब सदस्यांनी एकमेकांवर काही कारणास्तव रागावणे, चिडणे, रूसणे, फुगणे, अबोला धरणे असे अधूनमधून होत असले तरी ते थोडा काळ, क्षणिक असते. कुटुंबात रागावणे, चिडणे, रूसणे, फुगणे यातून निर्माण होणारा दुरावा फार काळ टिकत नाही. अशा जवळच्या नात्यात दुरावा सहन होत नाही. एकमेकांचा सहवास सतत हवाहवासा वाटतो. अशा नात्यात एकमेकांशिवाय करमत नाही. कारण अशा मैत्रीत दोन्ही बाजूंनी अतूट प्रेम असते. मुळात फायदा व हित या दोन शब्दांतच फरक आहे. फायद्यात स्वार्थी वासना असते तर हितात निःस्वार्थी भावना असते. भावनिक जवळीक हे एक वेगळेच रसायन आहे. तिथे भावनांक जुळणे महत्वाचे असते. असा भावनांक जिथे जुळतो तिथे जिवाभावाची मैत्री निर्माण होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.७.२०२४

आयुष्य कठीणच नव्हे तर असुरक्षित झालेय!

आयुष्य कठीणच नव्हे तर असुरक्षित झालेय!

बेदरकार वाहनाने धडक दिल्याने रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदाराचा मृत्यू, धनिक पुत्राच्या भरधाव कारने धडक देऊन दूरवर फरफटत नेल्याने महिलेचा मृत्यू, गर्दीत लोकल ट्रेन पकडताना रेल्वे रूळावर पडून महिलेने तिचे दोन्ही पाय गमावले, डॉक्टरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू, वकिलाच्या हलगर्जीपणामुळे कोर्टाने वकिलाला झापले, पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा तपास नीट केला नाही म्हणून न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे, एकतर्फी प्रेमातून मुलाने मुलीचा भररस्त्यात खून केला व बघ्याच्या गर्दीतले लोक त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मोबाईलमधून त्या खूनाचा व्हिडिओ काढत बसले, कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या, भोंदू बाबाने भोळ्या भक्तांना फसवले, असल्या बातम्या दररोज वाचायला मिळत आहेत. त्यातून समाजमनाचा स्तर तर कळतोच पण आयुष्य नुसते कठीणच नव्हे तर किती असुरक्षित झालेय हेही कळते. या नकारात्मक बातम्या परिस्थितीच्या हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. त्याखाली बरंच काही नकारात्मक आहे जे वर दिसत नाही. म्हणून सर्वकाही आलबेल आहे असे नाही. अशा नकारात्मक वातावरणात देवाचे नाव घेऊन सकारात्मक मानसिकता जपणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.७.२०२४

मंगळवार, ९ जुलै, २०२४

जोखीम!

जोखीम!

वकिली हीच जोखीम होती, त्यात धोका होता आणि त्या जोखीमेचे पडसाद आयुष्यावर पडले. माझ्या दिवसाची रात्र झाली आणि रात्रीचा दिवस झाला आणि माझे जैविक घड्याळ पार बिघडून गेले. याला व्यावसायिक जोखीम/धोका (आॕक्युपेशनल हजार्ड) म्हणतात. गिरणी कामगार कापड गिरणीत काम करताना त्यांच्या नाकातोंडात कापसाचे कण जायचे व त्यातून काही जणांना फुफ्फुसाचा क्षयरोग (टी.बी.) व्हायचा. ती तसली नोकरी हा सुद्धा व्यावसायिक जोखमीचा/धोक्याचा भाग होता.

१९८८ ला वकिली सुरू करण्यापूर्वी सर्वकाही ठीक होते. मी वेळेवर सकाळी लवकर उठायचो व रात्री लवकर झोपायचो. म्हणजे शाळा, कॉलेजचे शिक्षण चालू असताना व अकौंटस क्लार्कची नोकरी करीत असताना माझे जैविक घड्याळ एकदम नॉर्मल होते. तसे नसते तर मी उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो व नोकरीही करू शकलो नसतो. पण १९८८ साली इंडियन डेरी कॉर्पोरेशन (आय.डी.सी.) ही केंद्र सरकारची कंपनी बंद पडली व मला पाच वर्षांच्या नोकरीतच अकाली स्वेच्छा सेवानिवृत्ती (व्ही.आर.एस.) घ्यावी लागली व पुढे नोकरी करीत राहण्यापेक्षा वकिलीत पडण्याची मला हुक्की आली. आली लहर केला कहर या म्हणीनुसार माझ्या त्या हुक्कीने मला आयुष्यभर बुक्की मारली. बुक्की कसली सारख्या बुक्क्याच मारल्या आयुष्यभर.

सकाळी लवकर उठायची सवय म्हणून सकाळी १०.३० वाजता कोर्टात जाऊन बसायचो. कल्याण, उल्हासनगर, ठाणे, कॕट व हायकोर्ट या सगळ्या कोर्टात पहिली तीन वर्षे (१९८८-१९९०) सकाळी १०.३० ला जाऊन बसायचो. पण क्लायंटस मिळताना नाकीनऊ आले. सिनियर वकील महिन्याला ५०० रूपये देऊन चांगले राब राब राबवून घ्यायचे दिवसभर. लग्न तर केलेले, मुलगी तर झालेली आणि मग महिना ५०० रूपये कमवून संसार कसा चालणार माझा? मग कोर्टातून अक्षरशः पळ काढला आणि स्वतःच्या हिंमतीवर पार्ट टाईम लिगल कन्सल्टन्सीची कामे मिळवू लागलो. ती अर्धवेळ वकिलीची कामे सकाळी नसायची तर संध्याकाळी ४ ते ५ नंतर सुरू व्हायची. मग सकाळी लवकर कशाला उठून बसा? अशाप्रकारे माझे जैविक घड्याळ वकिलीने बिघडवले ते कायम बिघडवलेच. रात्रभर जागणे, सकाळी झोपून दुपारी उठणे व संध्याकाळी पार्ट टाईम लिगल कन्सल्टन्सी करणे हा दिनक्रम गेली २० ते २५ वर्षे चालू आहे. त्यामुळे माझे जैविक घड्याळ आता पूर्वपदावर व तेही ६८ वर्षाच्या उतार वयात येऊच शकत नाही. हा निद्रानाशाचा आजार नसून जैविक घड्याळ बिघडल्याचा आजार आहे जो अत्यंत जुनाट आहे. हा आजार बरोबर घेऊनच मी मरणार.

शेवटी व्हायचे ते झालेच. माझ्या उलट्या जैविक घड्याळामुळे शरीर बिघडले. हृदयात २ एवी ब्लॉक झाला व बद्धकोष्ठानंतर चुंबळ मूळव्याधीचा त्रास वाढत गेला. शौच कर्म करताना रक्त पडणे हे नित्याचे झाले. तीन कार्डिओलॉजिस्टसनी पेसमेकर सर्जरी करायलाच पाहिजे असे सांगितलेय तर तज्ञ एम.एस. (आयुर्वेद) डॉक्टरने चुंबळ रक्ती मूळव्याध तिसऱ्या स्टेजला (थर्ड डिगरी) गेल्याने मूळव्याध सर्जरी (आॕपरेशन) करायला सांगितलेय. दोन्ही आजाराची दोन आॕपरेशन्स व तीही ६८ या उतार वयात? मी हार्टचे पेसमेकर आॕपरेशन इच्छाशक्ती/मनोबलाच्या जोरावर टाळले आणि चालताना होणारा त्रास आपोआप कमी झाला. आता फक्त कोलेस्ट्राल कंट्रोल व रक्त पातळ करायच्या गोळ्या घेतो. मूळव्याध सर्जरी केली पाहिजे हे आता आयुर्वेदीक सर्जनने मला सांगितलेय. मी ती करणार नाही असे मनाला ठाम बजावलेय. यावर काही आयुर्वेदीक गोळ्या आहेत तेवढ्याच घेत राहणार. यामुळे पुढे काय होईल हे मला आज सांगता येणार नाही. भयंकर त्रासही होईल कदाचित. पण तरीही दोन्ही आॕपरेशन्स करायची नाहीत असे ठरवले आहे. बघूया निसर्ग किंवा परमेश्वर किती साथ देतो ते. वकिली व्यवसायात पडण्याची जोखीम घेतली व ती आयुष्यभर हिंमतीने पेलली. आता वृद्धापकाळी ही आरोग्याची जोखीम घेतोय. बघूया, या जोखमीचे काय होते ते!

मेरा नही, तेरा नही, मेरा नही तेरा नही, इसका नही उसका नही, किसीका नही, ये दोष तकदीर का सारा है, ये दोष तकदीर का सारा है! (दुश्मन चित्रपटातील गीत)

ही जोखीम अंगावर घेऊन पुढील खडतर आयुष्य जगत असताना ज्यांनी मला खूप आनंद दिला त्या जुन्या आठवणींना अधूनमधून उजाळा देत असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.७.२०२४

रविवार, ७ जुलै, २०२४

नैसर्गिक न्यायातला फरक!

माणसांचे नैसर्गिक जगणे व इतर सजीवांचे नैसर्गिक जगणे यातील मूलभूत फरक प्रथम समजून घेतला पाहिजे व मगच नैसर्गिक न्यायावर भाष्य केले पाहिजे! -ॲड.बी.एस.मोरे

सामाजिक कायदा न्याय तत्व!

माणसांच्या नैसर्गिक जगण्यात जी माणसे नैसर्गिक सहकार्य करतील त्यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण व अशा जगण्यात जी माणसे खोडा घालतील त्यांच्या विरूद्ध राजकीय युद्ध, हेच आंतरमानवी संबंधाचे नियमन करणाऱ्या सामाजिक कायद्याचे मूलभूत नैसर्गिक न्याय तत्व आहे! -ॲड.बी.एस.मोरे

तरूण तुर्क म्हातारे अर्क!

जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात संघर्ष करीत असलेली तरूणाई व तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात आयुष्याची उजळणी करीत बसलेली वृद्धाई यांच्यात समजदारीचे व पिढीचे फार मोठे अंतर असते त्यामुळे म्हाताऱ्या अर्कांनी तरूण तुर्कांच्या सुसंवादी प्रतिसादाची अपेक्षा करू नये! -ॲड.बी.एस.मोरे 

कायदा!

कायदा म्हणजे अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या माणसालाच नव्हे तर मुक्या जनावरालाही त्याच्या नैसर्गिक अधिवासात, मार्गावर नेऊन सोडण्याची किंवा तसे मार्गदर्शन करण्याची नैसर्गिक प्रक्रिया ज्या प्रक्रियेत नैसर्गिक न्याय समाविष्ट असतो! -ॲड.बी.एस.मोरे