https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

उतार वयातील लांबच्या सहलींचे आव्हान व त्रास!

उतार वयातील लांबच्या सहलींचे आव्हान व त्रास!

शाळा, कॉलेजेस तीच राहतात फक्त जुने विद्यार्थी बदलून त्यांची जागा नवे विद्यार्थी घेतात. उद्योगधंदे तेच राहतात फक्त जुने मालक, नोकर, चाकर बदलून त्यांची जागा नवे मालक, नोकर, चाकर घेतात. संस्था त्याच राहतात फक्त त्या संस्थेत जुनी माणसे जाऊन नवीन माणसे येतात. थोडक्यात काय तर पृथ्वीवर माणसे येतात जातात, पृथ्वी तीच राहते, सूर्य तोच राहतो, आकाशातील ग्रह, तारे तेच राहतात. अनेक करोडो वर्षानंतर कदाचित त्यांच्यात बदल होईलही पण तो बदल बघायला आपल्यापैकी कोणीही तोपर्यंत जिवंत नसणार.

वय काळानुसार माणसाच्या शरीर, मनात बदल होत जातो व तो बदल स्वीकारावाच लागतो. माझे काही वृद्ध मित्र जेव्हा मला म्हणतात की त्यांच्या डिक्शनरीत "म्हातारा" हा शब्दच नाही तेव्हा मला त्यांच्या त्या विचाराचे काय करावे हा प्रश्न पडतो. अशा या सर्व तरूण म्हाताऱ्यांना (सॉरी तरूण ज्येष्ठांना) माझा लांबून नमस्कार.

उत्तर भारतातील काश्मीर, हिमाचल प्रदेश ते दक्षिण भारतातील केरळ, कन्याकुमारी घ्या, हे सर्व प्रदेश तसेच राहतात. फक्त या प्रदेशांत राहणारी व या प्रदेशांना भेट देणारी माणसे तीच रहात नाहीत. ती वय, काळाने मरतात व त्यांची जागा नवीन माणसे घेतात. अर्थात या प्रदेशांत माणसे येतात, जातात.

भारतातीलच नव्हे तर जगातील विविध देशांचे, प्रदेशांचे मानवी मनाला आकर्षण असते. मनाचे हे आकर्षण बालमनात व तरूण मनात खूप असते. पण हे आकर्षण पुढे कायम रहात नाही. मी मुंबईला शाळेत असताना गिरणी कामगार पुढारी असलेल्या माझ्या वडिलांनी मला एक नाही तर दोन वेळा उत्तर भारतातील दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेस, पंजाब, हरयाणा, गुजरात या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखालील कामगार सहलींमधून फिरवले. बालपणात त्या सहलींचा जो आनंद, जी मजा मी घेतली ती मजा नंतर हळूहळू कमी होत गेली.

शालेय व कॉलेज जीवनात मी माझे मेहुणे कै. बी. एन. पवार व माझी बहीण हिराताई यांच्या मडगाव, गोवा येथील फ्लॅटमध्ये उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत चांगले महिना दोन महिने रहायचो. त्यावेळी माझे पवार भाऊजी तिथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे जनरल मॕनेजर होते. मी जेव्हा जेव्हा पवार भाऊजींच्या त्या मडगाव, गोव्याच्या घरी रहायला जायचो तेव्हा तेव्हा ते मला त्यांच्या मोटर सायकल वरून संपूर्ण गोवा फिरवायचे, मोठमोठया हॉटेलात घेऊन जायचे. माझ्या बालपण व तरूणपणातील त्या गोवा सहलींची  मी खूप मजा घेतली. आता उतार वयात बायकोला घेऊन मी गोव्याला गेलो तरी ती मजा बिलकुल येणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतो.

लग्नानंतर तरूणपणात बायकोला घेऊन अजिंठा, वेरूळ, अहमदाबाद, बडोदा या ठिकाणी फिरलो व एका श्रीमंत क्लायंटची केस मी २००९ साली २२ वर्षानंतर जिंकल्यानंतर त्यातून मिळालेल्या भरघोस फी मधून बायको व मुलीला घेऊन ९ दिवसांची काश्मीरची टूर केली पण माझ्या वडिलांबरोबर उत्तर भारतात लहानपणी फिरताना जेवढी मजा आली तेवढी मजा तरूणपणाच्या त्या सहलींत आली नाही.

आता माझे वय ६८ तर बायकोचे वय ६३ म्हणजे माझ्यापेक्षा ती तशी ५ वर्षांनी लहान. त्यामुळे माझ्या व तिच्या वृद्धापकालीन शारीरिक त्रासांत थोडाफार फरक आहे. तिला उच्च रक्तदाब, अधूनमधून वर्टिगो मुळे डोकेदुखी हे आजार आहेत तर मला २ एव्ही हार्ट ब्लॉक ज्यामुळे खूप संथपणे शरीराची हालचाल, रात्रभर जागरण व दिवसा झोप हे उलटे जैविक घड्याळ, अधूनमधून रक्ती मूळव्याधीचा त्रास हे आजार आहेत. त्यामुळे माझ्या विवाहित मुलीला आम्ही नवरा बायकोनी लांब फिरायला जावे, त्या सहलींचा मुक्त आनंद घ्यावा असे वाटून तिच्या खर्चाने अशा लांबच्या सहलींचे प्रस्ताव आमच्यापुढे ठेवले तरी या उतार वयात आम्ही ते स्वीकारू शकत नाही. मागे कोकणातील गणपतीपुळे येथे आमच्यासाठी मुलीने रिसॉर्ट बुक केले होते पण मी माझ्या शारीरिक त्रासामुळे ते बुकिंग रद्द केले. नंतर मुलीने नैनितालची सहल योजली. परंतु मी मला नको म्हटले व मग माझी मुलगी व बायको दोघीच नैनितालला जाऊन आल्या. त्यांनी आणलेली ताजी सफरचंदे मात्र मी चवीने घरी बसून खाल्ली.

माझा जावई व मुलगी दोघेही आम्हा दोघांची काळजी घेतात. त्यांच्या बरोबर लांबच्या सहलींना आम्हाला येण्याचा आग्रह करतात. पण मी सरळ नको म्हणतो. एक तर ते दोघे तरूण आणि आम्ही म्हातारे. मग आमच्या म्हाताऱ्या शरीराचे लोढणे त्यांच्याबरोबर फिरत बळेच ओढणे मला पसंत नाही. शिवाय ते दोघे त्यांच्या तरूण वयामुळे जसा अशा लांबच्या सहलींचा मनमुराद आनंद घेऊ शकतात तसा आनंद आम्ही घेऊ शकत नाही हे माहीत आहे. ज्या गोष्टी आम्ही एन्जॉयच करू शकत नाही त्यावर उगाच खर्च कशाला करा हा माझा सरळ हिशोब आहे. उलट त्यांच्या बरोबर आमच्या फिरण्याने त्यांच्या आनंदात विरजन पडायचे. शिवाय समजा मी जर हार्ट अटॕकने तिकडे लांबच्या ठिकाणीच कुठे मेलो तर आला का मुलीला, जावयाला व बायकोला त्रास माझे प्रेत विमानात घालून जाळण्यासाठी मुंबईला आणण्याचा. ही भीतीही तशी मनात असतेच. म्हणून मी आता लांबच्या सहली टाळतो कारण म्हाताऱ्या शरीराचे लोढणे बळेच ओढणे व लांब कुठेतरी फरफटत नेणे माझ्या उतार वयीन मनाला पटत नाही. उतार वयात लांबच्या सहली तशा त्रासदायकच. होता होईल तेवढ्या म्हाताऱ्या माणसांनी त्या टाळाव्यात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा